वाढत्या विकासाबरोबर प्रदूषणाची समस्याही वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे जनतेच्या आरोग्यमय, आनंदी आणि उत्पादनशील जीवनाला बाधा येत आहे. सरकारने आणि प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीत झालेल्या एका परिषदेत राष्ट्रपतींनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. धोरणाची अंमलबजावणी करताना वातावरणातील बदलांनाही केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे. कारण वातावरणातील बदलामुळे आरोग्याची समस्याही वाढत असून प्रदूषणही वाढत्या बदलांना कारणीभूत असल्याचे मुखर्जी म्हणाले.
शहरांमधील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे नागरिकांचा आनंददायी जीवन जगण्याचा हक्क हिरावला जात असून प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे हे काळाची गरज आहे. यासाठी सरकारचे प्रयत्नही अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
देशाची राजधानी आणि अन्य शहरांमधील प्रदूषण गेल्या काही काळापासून वाढत असून त्यासाठी तात्काळ महत्त्वाची पावले उचलण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रपतीच्या मते, २०१५ चे वर्ष इतिहासात सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदलांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. धोरण आखताना वातावरणातील बदलांचाही विचार झाला पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
वातावरणातील बदलाचे संकेत अनेक वेळा मिळाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तामिळनाडूमध्ये आलेल्या महापुरामुळे अगणित मानवी त्रास आणि आर्थिक नुकसान झाले होते. यासाठी राज्यांची आपत्ती निवारण सेवा अधिक विज्ञानशील आणि नैसर्गिक प्रकोपापासून कमी नुकसान दायक ठरेल, अशी सक्षम बनविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. या परिषदेला २३ राज्यपालांसोबतच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन राज्यपालांनी सहभाग घेतला होता.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)