Oppo कंपनीने भारतातील आपल्या एका लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा Oppo A5s हा फोन आता स्वस्त झाला आहे. या फोनच्या 4GB रॅम व्हेरिअंटमध्ये कंपनीकडून एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन आता ग्राहकांना 11,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉल यांसारख्या मुख्य इ-कॉमर्स संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 2GB, 3GB आणि 4GB रॅम अशा तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यातील 4GB रॅम व्हेरिअंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. तर 2GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 8,990 रुपये आणि 3GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 9,990 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन्स –
या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच एलसीडी डिस्प्ले असून वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह मीडियाटेक हीलियो P35 प्रोसेसर देण्यात आलं आहे. हा फोन कंपनीच्या स्वतःच्या अँड्रॉइड ऑरियो बेस्ड ColorOS 5.2.1 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल. यात 32जीबी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजचे पर्याय आहेत, शिवाय मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येणं शक्य आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला 13MP+2MP असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा आहे. 4320mAh क्षमतेची बॅटरी यात असून कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस आणि ब्ल्यू-टुथ यांसारखे पर्याय आहेत.