अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आरोग्यास अपायकारक असून अशा प्रकारच्या अन्न पदार्थाचे सेवन केल्यामुळे येत्या दशकामध्ये कर्करोगाचा धोका बळावत जाणार असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये कार्बनयुक्त पेय, पॅकिंगमधील तयार अन्नपदार्थ, शर्करायुक्त दुधात टाकून सेवन  करावयाचे पदार्थ (ब्रेकफास्ट सीरियल), तयार अन्नपदार्थ (रेडी टू इट मिल), पॅकिंगमधील मांसाची उत्पादने यामध्ये अनेकदा शर्करा, मेद, आणि मिठाचे प्रमाण अधिक असून जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असते. ब्राझीलमधील साओ पावलो विद्यापीठ आणि पोषण रोगपरिस्थती विज्ञान संशोधन कार्यसंघ (ईआरईएन) येथील संशोधकांनुसार बऱ्याच विकसित देशांतील लोक अशा प्रकारचे प्रक्रिया केलेल्या अन्नाचा दैनंदिन आहारात समावेश करतात.

एकूण आहाराच्या ५० टक्के आहारात या अति प्रक्रिया कलेल्या पदार्थाचा समावेश असतो. काही अभ्यासांमध्ये अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि लठ्ठपणाचा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रोलशी संबंधित असल्याचे मांडले आहे. या अभ्यासात १,९४,९८० निरोगी व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला, यामध्ये (२२ टक्के प्रमाण पुरुष, तर ७८ टक्के महिला होत्या) यांचे सरासरी वय ४३ होते.

यामध्ये त्यांच्या खाद्यपदार्थ सेवनांच्या सवयीबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये आहारात अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये दहा टक्क्यांनी वाढ केल्याने कर्करोगाच्या धोक्यात १२ टक्क्यांनी वाढ होते. तर  स्तनाच्या कर्करोग होण्याच्या शक्यतेत ११ टक्क्यांनी वाढ होते. या अभ्यासामध्ये अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामुळे एकूणच कर्करोगाचा विशेषत: स्तन कर्करोगाचा धोका कसा निर्माण होतो याचा छडा लावण्यात आला. असे संशोधकांनी सांगितले.

प्रक्रियात्मक अन्नपदार्थाचे इतर काय परिणाम होतात यासाठी अजून अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी सांगितले. हा अभ्यास ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ या नियतकालिकात प्रसिद्ध  करण्यात आला आहे.