वांगे ही फळभाजी औषधी आहे. यावर सर्वसामान्य जनांचा विश्वास बसणार नाही. हल्ली स्टेरॉईड औषधांचे बंड खूप माजले आहे. शरीरात एकदम जोम आणण्याकरिता, रोगाला लगेच आवर घालण्याकरिता स्टेरॉईड असलेली औषधे घेतली जातात. अ‍ॅथलेट, मैदानी खेळ खेळणारे खेळाडू याच घटकद्रव्यांचा गैरवाजवी उपयोग करीत असलेल्या कथा आपण ऐकतो. वांगे या फळाच्या फॅमिलीत नैसर्गिक स्टेरॉईड आहेत.

थोडय़ाशा श्रमाने थकवा येऊ नये, शरीर सक्षम व्हावे म्हणून कोवळी बिनबियांची वांगी खावीत. घाम कमी येतो, घामावाटे शरीरातील चांगली द्रव्ये, फाजील प्रमाणात बाहेर जाण्याची क्रिया थांबते. जादा बी असलेले वांगे खाऊन आतल्या बियांमुळे वृक्क किंवा मूत्रमार्गात मूत्राश्मरी बनण्याची शक्यता असते. वांगे रुची आणणाऱ्या भाज्यांत अग्रेसर आहे.

कफप्रधान व फुप्फुसाच्या विकारात कोवळय़ा वांग्याचा रस किंवा शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून त्याच्या पोटिसाचा शेक द्यावा. गळवे बसतात. पू होत नाही. ज्वारीमध्ये वांगे शिजवले की, पूर्ण निदरेष होते. त्यातील काही असलेले नसलेले विषार दूर होतात. कृश व्यक्तींनी शिजवलेलीच वांगी खावीत.

तरुणांनी व बलवानांनी भरपूर श्रमाची कामे ज्यांना करावयाची आहेत त्यांनी कोवळे कच्चे वांगे खावे व त्यासोबत आले, लसूण, जिरे, ओवा, लिंबू, मीठ, हिंग, ताक असे तोंडी लावण्याचे पदार्थ प्रकृतीनीरुप व आवडीप्रमाणे खावे. वांग्याच्या पानांचा रस मूत्रच आहे. ज्यांना लघवी कमी होते, मसालेदार पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ खाऊन लघवीचा त्रास होता, त्यांनी वांग्याच्या पानांचा रस प्यावा.

वृद्ध माणसांच्या कफ विकारात वांग्याच्या पानांचा चहासारखा काढा उपयुक्त आहे. आमाशयात कफ साठला असेल तर वांग्याच्या पानांचा रस प्यावा. कफ पडून जातो. पोटदुखी, मुरडा, मलावरोध असणाऱ्या व वृद्ध व्यक्तींनी वांगी खाणे टाळावे.