जास्त उत्पन्न मिळवणारे लोक नंतर स्वार्थीपणाकडे झुकतात तर जे लोक तुलनेने कमी पैसे मिळवत असतात ते त्यांचे नातेसंबंध चांगल्या प्रकारे जपतात तसेच त्यांची इतर लोकांशी मित्रता वाढवण्याची वृत्ती असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. खूप पैसा मिळवला की, सर्व समस्या सुटतात असा अनेकांचा समज असतो पण तो खरा नाही. उलट जास्त पैसे मिळवणाऱ्या व्यक्ती त्यांच्या जीवनात आपल्यापुरते पाहतात, थोडक्यात पैशाने सुख विकत घेता येत नाही असे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पॉल पीफ यांनी मानसशास्त्रीय संशोधनात  म्हटले आहे. जर्नल इमोशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात १५१९ लोकांची पाहणी करण्यात आली. यात लोकांना त्यांचे उत्पन्न विचारण्यात आले होते व एक प्रश्नावली देण्यात आली होती. त्यात सुख, आश्चर्य, सहवेदना, समाधान, उत्साह, प्रेम व अभिमान तसेच गमतीदारपणा अशा अनेक भावनांचा उल्लेख होता. इतरांना काही देताना आपल्याला आतून समाधान वाटते असे अनेकांनी त्यात म्हटले आहे, जे लोक जास्त उत्पन्न गटातील होते त्यांनी अभिमानाची भावना असल्याचे सांगितले.

गरीब लोकांनी सहवेदना व प्रेम या भावनांवर भर देताना जगात भरपूर सौंदर्य असल्याचे सांगून आजूबाजूच्या जगाबाबत आश्चर्य व नवतेची भावना व्यक्त केली आहे. याचा अर्थ पैसा ही बाब सुखाचे मोजमाप ठरवत नाही असा काढण्यात आला आहे.

श्रीमंत लोकांना त्यांनी मिळवलेली धनदौलत, पदे, व्यक्तिगत कामगिरी यात जास्त समाधान असते. तर गरिबांना इतरांच्या सुखात आपले सुख सापडते. श्रीमंत लोक आर्थिक स्वयंपूर्णता मिळवून कुणावर अवलंबित्व राहणार नाही असा विचार करतात. गरीब लोक मात्र सहजीवनाचा विचार करतात असेही या मानसशास्त्रीय संशोधनात दिसून आले. यातून श्रीमंत व गरीब यांच्या मानसशास्त्रीय वर्तनाचा उलगडा होतो.