07 March 2021

News Flash

बाल मनोविकार

मुलांमधील मानसिक आरोग्याचे प्रश्न मोठय़ा विचित्र रूपात अभिव्यक्त होऊ  शकतात

डॉ. मीलन बालकृष्णन, मानसोपचारतज्ज्ञ

मुलांच्या शारीरिक आजारांकडे पालक लक्ष देतात, मात्र मानसिक आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याचे पालक गृहीत धरतात. मात्र योग्य वेळी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले देणे गरजेचे आहे.

आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न त्यांच्या स्वभावाचाच एक भाग असल्याचे गृहीत धरून पालक बहुतांश वेळा त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मदत मागायला घाबरतात. त्यामुळे मनोविकाराचे निदान लांबते आणि मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच लहान मुलांना भेडसावू शकणाऱ्या मानसिक समस्यांविषयी पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना अधिक सुलभतेने मदत मिळू शकेल आणि त्यामुळे उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळू शकतील.

मुलांमधील मानसिक आरोग्याचे प्रश्न मोठय़ा विचित्र रूपात अभिव्यक्त होऊ  शकतात. अलीकडेच गेमिंगचे व्यसन लागलेल्या शुभमला (नाव बदलले आहे) त्याचे पालक आमच्याकडे घेऊन आले होते. पण शुभमच्या या वागण्याचे सखोल परीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आले की त्याला तीव्र स्वरूपाच्या एन्क्झायटी डिसॉर्डरची समस्या होती आणि गेम्स हा त्याने भोवतीच्या जगापासून आणि आपल्या मनातल्या चिंतांपासून दूर जाण्यासाठी शोधलेला एक मार्ग होता. त्याच्या एन्क्झायटीवर उपचार झाले तसे त्याचे गेम खेळण्याचे वेड खूपच कमी झाले आणि गेमिंगला पळवाट म्हणून वापरण्याऐवजी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून वापरणे त्याला जमू लागले.

लहान मुलांमधील अशा मानसिक समस्या वेळीच ओळखण्याचे काम पालक आणि शिक्षकांना सर्वात चांगल्या प्रकारे जमू शकते. कारण त्याच मुलांच्या सर्वात जवळच्या व्यक्ती असतात, त्यामुळे मुलांचे वागणे धोकादायक वळणावर जात असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतील काही बदलामांध्ये स्पष्टपणे दिसतात.

लक्ष द्यावे असे काही बदल

’ शाळेतील कामगिरीमध्ये बदल :

शाळेतील कामगिरी खालावणे, गुण किंवा ग्रेड्समध्ये घसरण, एकाग्रता ढळणे, लक्ष न लागणे, एका जागी बसता न येणे आणि पाल्याच्या वागण्याबद्दल शाळेमधून वारंवार तक्रारी येणे हे काही महत्त्वाचे बदल आहेत.

’ वर्तणुकीतील बदल :

लहान मुले आपल्या समस्या मोठय़ाप्रमाणे स्पष्ट बोलून दाखवू शकत नाहीत, पण त्यांच्या वर्तणुकीतून बरेचदा काहीतरी बिनसल्याचे इशारे मिळत असतात. आक्रमक होणे, शाळेमध्ये किंवा घरामध्ये रागाचा उद्रेक होणे, भांडण काढणे आणि सतत वाद घालणे अशा वागण्यातून हे इशारे मिळू शकतात. लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक चाळ्यांसारख्या धोकादायक वर्तनातही वाढ होऊ  शकते.

’ लहरीपणा :

एखादे मूल नेहमीसारखे इतरांमध्ये मिसळत नसेल, खूप काळासाठी एकटे एकटे राहत असेल तर ही धोक्याची सूचना मानायला हवी. दोन आठवडय़ांहून अधिक काळ असे लहरी वागणे, मूडीपणा तसाच राहिला आणि त्याचा प्रभाव शाळेत किंवा घरामध्ये दिसू लागला तर पालकांनी किंवा शिक्षकांनी हा इशारा गांभीर्याने घ्यायला हवा. मूल अचानकपणे खेळायला जाणे टाळू लागले किंवा घरातच कोंडून राहू लागले तर हीसुद्धा धोक्याची सूचना मानावी.

’ भावनांची तीव्र आंदोलने :

रोजची कामे करताना मुलांच्या मनाला भीतीने, निराश करणाऱ्या भावनांनी ग्रासले असेल आणि जोडीला त्यांच्या हृदयाची धडधड वाढली असेल, श्वास जलद झाला असेल तर या गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहायला हवे.

’ वजनात अनाकलनीय घट :

अचानक भूक लागेनाशी होणे किंवा खूप भूक लागणे हेसुद्धा भावनिक समस्येचे लक्षण असू शकते. सतत उलटय़ा होणे किंवा लॅक्सेटिव्ह्ज घ्यावी लागणे यातून इटिंग डिसॉर्डर म्हणजे खाण्याशी संबंधित समस्येचा इशारा मिळू शकतो. बरेचदा गंभीर अवस्थेला पोहोचेपर्यंत या समस्येचे निदान होत नाही.

’ शारीरिक लक्षणे :

मुलांमधील निराशा आणि चिंतेची लक्षणे मोठय़ांसारखी नसतात. मुलांमध्ये ती सततची डोकेदुखी आणि पोटदुखी यांच्या रूपातही दिसू शकतात. या समस्यांमुळे मुलांचे झोपेचे आणि भुकेचे वेळापत्रकही बिघडते.

’ स्वत:ला इजा करून घेणे :

काही वेळा मानसिक समस्येमुळे मुले स्वत:ला इजा, दुखापत करून घेतात. उदाहरणार्थ, स्वत:ला भाजून घेणे, स्वत:वर वार करणे किंवा मनात आत्महत्येचे विचार घोळणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न. ज्या मुलांच्या बोलण्यात सतत मृत्यूचा विषय असतो किंवा जी मुले स्वत:ला इजा करून घेतात अशा मुलांचे वागणे गांभीर्याने घ्यायला हवे आणि त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय मदत घ्यायला हवी.

’ व्यसनाधीनता :

बरेचदा, तरुण मुले आपल्या प्रश्नांपासून पळवाट शोधण्याच्या नादात अमली पदार्थ किंवा दारूच्या प्रभावाखाली येऊ  शकतात. यामुळे ती कोवळ्या वयातच व्यसनाधीन होऊ  शकतात.

’ इतर लक्षणे :

काही मुले इतरांपासून तुटल्याप्रमाणे वागतात, त्यांचे मित्र टिकत नाहीत किंवा ती इतरांच्या नजरेला नजर देत नाहीत. ज्यांच्या वर्तणुकीतून हे लक्षणीय बदल दिसतात, अशा मुलांचे मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून परीक्षण व्हायला हवे. बरेचदा पालक बळजबरीने मुलाला डॉक्टरांकडे आणतात. असे केल्याने मूल अधिकच दु:खी होते, गोंधळून जाते. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत खुद्द समस्याग्रस्त मुलाला सामील करून घेणे हे पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:08 am

Web Title: psychosis in children childhood schizophrenia zws 70
Next Stories
1 सौंदर्यभान : बॉडी कॉन्टूरिंग ट्रीटमेंट
2 7,000mAh बॅटरीचा Samsung Galaxy F62 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत-फिचर्स
3 टूलकिट प्रकरण : दिल्ली पोलिसांनी Zoom कडे मागितली ‘त्या’ मिटिंगची सविस्तर माहिती
Just Now!
X