लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG प्रेमींसाठी चांगली बातमी आहे. लवकरच पबजी गेमचा सिक्वेल अर्थात PUBG Mobile 2 येणार असल्याचं वृत्त आहे. नवीन गेम आधुनिक शस्त्रास्त्रे, नवीन मॅप आणि अन्य काही गॅजेट्सचा समावेश केलेला दिसेल. सप्टेंबर 2020 मध्ये सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर सुरक्षेच्या कारणास्तव PUBG Mobile ला भारतात बंदी घालण्यात आली आहे.

PlayerIGN नावाच्या ट्विटर हँडलवरुन एका टिपस्टरने PUBG Mobile 2 पुढील आठवड्यात लाँच होईल, असा दावा केला आहे. एका Weibo पोस्टच्या आधारे त्याने, ‘वर्ष 2051 वर PUBG Mobile 2 गेम आधारित असेल आणि आधूनिक शस्त्रास्त्रे, नवीन गॅजेट्स आणि एका नवीन मॅपसोबत हा गेम येईल. तसेच, अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी गेम जारी केला जाईल’, अशी माहिती शेअर केली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या PUBG Global Invitational.S 2021 या स्पर्धेमध्ये Krafton कडून नवीन गेम लाँच केला जाईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

PUBG Mobile 2 हा गेम दक्षिण कोरियाची Krafton कंपनी डेव्हलप करत असल्याची माहिती आहे. PUBG Corporation ने पबजी भारतात बॅन झाल्यानंतर Tencent Games कडून भारतातील सर्व जबाबदारी काढून घेतली होती. पण अद्याप PUBG Mobile 2 बाबत डेव्हलपर्सकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे गेम नक्की लाँच होईलच हे ठामपणे सांगता येणार नाही. तसेच, भारतात हा गेम लाँच होणार की नाही हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही. भारतात लाँचिंगसाठी PUBG Corporation ला सरकारकडून परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. नवीन गेमचा चीनसोबत काही संबंध आहे की नाही हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही, तसं असल्यास भारतात या गेमला लाँचिंगची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे.