PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) हा जगभरात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या बॅटल रॉयल गेमपैकी एक आहे. जगभरात या गेमचे 60 कोटीपेक्षा जास्त प्लेयर्स आहेत. इतक्या मोठ्या संख्येत युजर्स असल्याने गेमला अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी हा गेम भारतात बॅन झालाय आणि आता हॅकर्सकडून वाढलेलं चिटिंगचं प्रमाण गेमसाठी मोठी समस्या ठरत आहे.

गेमदरम्यान हॅकर्स विविध मार्गाने चिटिंग करत असतात. अशा हॅकर्सविरोधात पब्जी गेम बनवणाऱ्या Tencent ने मोठं पाऊल उचललंय. 8 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत कंपनीने तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त (1,217,342) अकाउंट कायमस्वरूपी बॅन केले. कंपनीच्या लेटेस्ट Anti-Cheating रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये. बॅन केलेल्यांपैकी 48 टक्के हॅकर्सवर Auto-aim हॅक किंवा कॅरेक्टर मॉडेल चेंज केल्यामुळे बंदी घातली आहे. तर, 22 टक्के प्लेयर्स एक्स-रे व्हिजनचा वापर केल्याबद्दल, 12 टक्के युजर्सना स्पीड हॅक आणि 7 टक्के युजर्सना एरिया डॅमेज मॉडिफाय करण्यासाठी बॅन करण्यात आलंय. Tencent ने शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये हॅकर्सचा रँकही शेअर करण्यात आलाय. यानुसार बॅन केलेल्यांपैकी 38 टक्के प्लेयर्स ब्राँझ, 11 टक्के सिल्व्हर, 9 टक्के गोल्ड, 11 टक्के प्लॅटिनम, 12 टक्के डायमंड, 10 टक्के क्राउन, 6 टक्के Ace आणि 3 टक्के Conqueror रँकचे होते.

दरम्यान, भारतामध्ये PUBG Mobile वर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून या गेमचं भारतीय व्हर्जनमध्ये पुनरागमन होणार असल्याच्या विविध बातम्या येत आहेत. अलिकडेच एका ट्विटर युजरने 15 जानेवारी ते 19 जानेवारीमध्ये PUBG Mobile India बाबत मोठी घोषणा होईल असा दावा केला होता. पण कोणतीही घोषणा झाली नाही. तर, काही आठवड्यांपूर्वी या गेमच्या लाँचिंगबाबत दाखल केलेल्या आरटीआयमधील प्रश्नावर सरकारने घाईघाईत निर्णय घेणार नसल्याचं उत्तर दिलंय. तसेच अॅपबाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतरच लाँचिंगची परवानगी दिली जाईल असंही स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्यातरी पब्जीच्या भारतातील पुनरामनाबाबत केवळ चर्चाच सुरू आहेत, पण कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही.