Public provident fund interest rate : सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (PPF) व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. PPFचा व्याजदर इतक्या निचांकी पातळीवर जाण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. पुढील आठवड्यात २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाही म्हणजेच जुलै-सप्टेबर या कालावधीसाठी नवीन व्याजदर लागू केले जाऊ शकतात. या तिमाहिच्या नव्या व्याजदरानुसार पीपीएफचा व्याजदार कमी झाल्यास हा ४६ वर्षातील नीचांक असेल. याआधी १९७४ मध्ये पीपीएफचा व्याजदर सात टक्केंपेक्षा कमी झाला होता.

छोट्या बचत योजनांना दहा वर्षांच्या सरकारी बॉण्डची सुरक्षा आहे. प्रत्येक तीन महिन्याच्या सुरुवातीला पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनासोबतच अन्य सरकारी योजनाचा व्यजदर ठरवला जातो. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याजदर मिळतोय. एप्रिल ते जून पर्यंतच्या तिमाहिचा व्याजदर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ठरवण्यात आला होता. याआधी जानेवारी ते मार्च या तिमाहिचा व्याजदर ७.९ टक्के होता.

याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनावरही मोठी कपात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या बचतीवर ८.६ टक्केंवरून ७.४ टक्के व्याज मिळत आहे. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर १.१० टक्के व्याज कमी झाले असून या अंतर्गत गुंतवणूकदारांना ६.८ टक्के व्याज मिळतेय. यामध्ये जुलै ते सप्टेबरच्या तिमाहिमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे.

छोट्या बचत योजनांनाच्या व्याजदरात नेहमीच कपात केली जाते. बँकमध्ये जमा रक्कमेचा व्याजदर कमी होत असतो. एफडीच्या व्याज दरामध्येही झपाट्याने घट झाली आहे. एसबीआय सध्या सात ते ४५ दिवसांच्या जमा रकमेवर २.९ टक्के व्याज देत आहे. जो सेव्हिंग्ज खात्तयावर मिळणाऱ्या २.७ टक्के व्याज दरापेक्षा थोडीसी जास्त आहे. पीपीएफ खात्याचा मॅच्योरिटीचा कालावधी १५ वर्ष असतो, ज्यामध्ये वर्षाला ५०० रुपये आणि जास्तित जास्त एक लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.