जगाची थाळी
प्राजक्ता पाडगावकर – response.lokprabha@expressindia.com

घागरे, भरीत, भाजी या स्वरूपात आपल्याला आवडणारा भोपळा चीनपासून म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे लोकप्रिय आहे.

‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक!’ भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारीची गोष्ट किती तरी पिढय़ांना रमवते आहे, शिकवते आहे आणि शहाणे करत आहे. मला मात्र लहानपणापासून सतत प्रश्न पडे, एखादी म्हातारी आजी बसेल एवढी जागा आली कुठून भोपळ्यात? कसे असतात खरे हे भोपळे, असे कुठले बरे गाव असावे जिथे एवढे मोठे भोपळे उगवतात?

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
pune , pune rain marathi news
उकाड्यापासून दिलासा…आजपासून तीन दिवस पाऊस
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

हे भोपळे मात्र प्रत्येक नव्या पुस्तकातून भेटतच राहिले, म्हणजे सिंड्रेलासाठी घोडागाडी मोठय़ा भोपळ्यातून तयार करणारी परी आणि मग हॅरी पॉटरच्या जादूई विश्वात तर सगळेच विद्यार्थी सततच भोपळ्याचा रस पीत असतात! असा हा बहुगुणी, जादूई भोपळा सगळीकडे माहीत असलेला असाच आहे.

भोपळा हा मुळात उत्तर आणि मध्य अमेरिकेत उगवणारी फळभाजी आहे. ख्रिस्त पूर्व सन सात हजार ते ५५०० या काळातले भोपळ्याच्या बियांचे अवशेष मेक्सिकोमध्ये आढळतात. भोपळ्यात अ जीवनसत्त्व विशेषकरून आढळते, त्याचा नािरगी, तांबडा रंग हे दर्शवतो.

भोपळ्याची सगळ्यात जास्त लागवड ही अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, भारत आणि चीन इथे होते. भोपळ्यांची एकंदर माहिती शोधताना, मला माझ्या म्हातारीच्या गोष्टीतल्या भोपळ्याचेदेखील उत्तर मिळाले! अमेरिकेत आणि युरोपमध्ये एका विशिष्ट भोपळ्याच्या जातीची लागवड केली जाते, कुकुर्बिटा मॅक्सिमल.

या जातीचे भोपळे हे आकाराने आणि पर्यायाने वजनाने अतिशय मोठे असतात. अमेरिकेतले शेतकरी उत्साहाने ही जात लावतात, यातून एक टनापर्यंत वजनाचे भोपळे तयार होतात. दरवर्षी हे असले महाकाय भोपळे स्पध्रेसाठी पिकवले जातात. त्यात यांचे वजन, आकार या गोष्टींचा निकष लावला जातो. जागतिक विश्वविक्रम म्हणून नोंदवलेला महाकाय भोपळा, सन २०१६ रोजी बेल्जियम इथे पिकवला गेला होता, तब्बल ११९०.५ किलो वजनाचा! एवढे मोठे भोपळे केवळ मनोरंजनासाठी आणि स्पध्रेसाठी पिकवले जातात.

या व्यतिरिक्त हॅलोवीन या सणानिमित्त अमेरिकेत भोपळे कोरण्यात किंवा रंगवण्यात येतात. या परंपरेची सुरुवात आयर्लण्डमध्ये झाली होती, मात्र तिथे रताळ्यासारखी स्थानिक कंदमुळं किंवा इतर गोलाकार फळभाज्या कोरल्या जात, कालांतराने आयरिश लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले, त्यांनी अमेरिकेत सहज उपलब्ध असलेला भोपळा यासाठी निवडला आणि आजपर्यत ही परंपरा सुरू आहे.

अशी एक समजूत आहे की कोलंबस जेव्हा मायदेशी परतला, तेव्हा त्याने सोबत अनेक आकारांचे भोपळे नेले होते. याच बियांपासून युरोपातले पहिले भोपळ्याचे पीक घेतले गेले. युरोपातून ही वनस्पती जगभर फिरली. आता अंटाíक्टका सोडून सहा भूखंडांवर हे पीक घेतले जाते. जगभरात भोपळ्याचे तिखटाचे आणि गोडाचे अनेक पदार्थ बनवले जातात. या भोपळ्याची भाजी केली जाते, कधी भरीत तर कधी घारगे! प्रवासात हमखास सोबत करणारे घारगे, घरच्या आठवणींनी तोंड गोड करतात. असे हे तांबडय़ा भोपळ्याचे घारगे कुठे इतरत्र सापडले तर काय मज्जा येईल!

घारगेसदृश काही सापडले ते अगदीच भारताच्या जवळ चीनमध्ये!

चीनमध्ये कापणीनंतर धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, तेव्हा ती सगळी समृद्धी साजरी करण्यासाठी जो पदार्थ आवर्जून बनवला जातो तो म्हणजे भोपळ्याचा पुरीसदृश पदार्थ- पम्पकीन केक्स! याची पद्धतदेखील अतिशय रंजक आहे! भोपळ्याचे तुकडे करून ते वाफवून घेतले जातात. त्यानंतर त्यातले जमेल तेवढे पाणी काढून टाकले जाते. भोपळ्याचा एकजीव असा रस करून त्यात मावेल एवढी तांदूळ पिठी, पिठी साखर, दुधाची भुकटी आणि लोणी घालून हे पीठ व्यवस्थित कालवून घेतले जाते. या पिठाचे पुरीसाठी लागतील एवढे गोळे केले जातात. पुरीपेक्षा किंचित जाडसर लाटून या लाटय़ा वाफवून घेतल्या जातात. त्या कोमट असताना त्यांना ब्रेडक्रम्ब्स किंवा पानको (लादी पावाची भुकटी) लावून तेलात तळून घेतले जाते. वरून खुशखुशीत आणि आतून किंचित नरम असे हे पम्पकीन केक्स बघून भोपळ्याचे घारगे आठवतात. यात थोडय़ाफार फरकाने अनेक प्रकार बनवले जातात. रेडबीन पेस्ट घालूनदेखील या पुऱ्या तळून घेतल्या जातात, तर कधी शेंगदाणे, साखर असे मिश्रणदेखील यात भरले जाते. हिवाळ्याच्या सुरुवातीला हे पदार्थ आवर्जून बनवले जातात आणि गरमागरम खाल्ले जातात. चीनमध्ये हे पदार्थ मोठय़ा प्रमाणात घराघरांत, सणासुदीला बनवले जातात.

महाराष्ट्रात मात्र घारगे वर्षभर बनवले जातात.

घारगे जास्त करून गूळ घालून बनवले जातात, मात्र काही वेळा साखर वापरूनदेखील हे बनवले जातात. त्यातील वेलदोडय़ाची सुवासिक चव अतिशय मोहक लागते. तांबडय़ा भोपळ्याची खीर, हलवा, बर्फी असेदेखील अनेक पदार्थ भारतात बनवले जातात. त्याचबरोबर सांबार, रस्से आणि इतर भाज्यांमध्ये देखील तांबडा भोपळा वापरला जातो.

जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने भोपळ्याचा वापर जेवणात केला जातो. सुप्स, पाय (स्र््री) यात अधिक तर वापर होतो. अमेरिकेत आणि कॅनडात थॅक्सगिव्हिंग या सणासाठी पम्पकीन पाय आवर्जून बनवला जातो. सप्टेंबरच्या शेवटी, ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत लोक प्रत्येक गोष्टीत भोपळा वापरू लागतात. इथे सुवासिक मेणबत्त्या, इतर सुवासिक प्रसाधने आणि कॉफी या सगळ्यात हा पम्पकीन स्पाईस आवर्जून वापरला जातो. स्टारबक्स या कॉफी विकणाऱ्या कंपनीने सन २००३ मध्ये पहिल्यांदा मर्यादित काळासाठी या भोपळ्याच्या चवीच्या कॉफीची विक्री सुरू केली. लोकांनी ही कल्पना उचलून धरली, अक्षरश डोक्यावर घेतली असेच म्हणावे लागेल. कारण एका हंगामामध्ये स्टारबक्सने या पम्पकीन स्पाईस लात्ते (PSL) मधून १०० मिलियन डॉलर्स एवढा पसा कमावला. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की, या कॉफीमध्ये पुढे जवळजवळ बारा वर्षे, सन २०१५ पर्यंत खऱ्या भोपळ्याचा लवलेशही नव्हता! आजदेखील दर पानगळीच्या मोसमात लोक आवर्जून ही पम्कीन स्पाईस लात्ते मागवतात, ट्विटरवर पम्कीन स्पाईस लात्तेचा निराळा हॅशटॅग आहे #ढरछ आणि स्टारबक्सच्या मते यावर दररोज जवळजवळ तीन हजार लोक टॅग करतात, तसेच ट्विटरवर पम्कीन स्पाईस लात्तेचे निराळे अकाऊंटदेखील आहे!

अगदी पाचशे वर्षांपूर्वी भोपळा जगात सर्वत्र आढळू लागला तेव्हा जशी आणि जेवढी उत्सुकता या फळभाजीबाबत होती, तेवढेच किंवा त्याहून अधिक गारूड भोपळ्याने सध्याच्या पिढीवर घातले आहे, हे या सगळ्यातून निश्चित स्पष्ट होते. अमेरिकेत किंवा आता सर्वत्रच पानगळ म्हणजे हॅलोविन आणि हॅलोविन म्हणजे भोपळा हे समीकरण पक्के झाले आहे. त्याचबरोबर स्टारबक्सची पम्पकीन स्पाईस लात्ते नक्कीच प्यावी लागते! जुन्या रिवाजासारखे नवीन काळातले हे रिवाजदेखील अजून तरी शेतातील कापणीवर अवलंबून आहेत, हे थोडे विस्मयाचे तरी आश्वासक आहे असेच म्हणावे लागेल! जोवर हे सुरू आहे, तोवर तरी भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट ऐकून येणारी प्रत्येक नवीन पिढी म्हणत राहील, ‘चल रे भोपळ्या..’
सौजन्य – लोकप्रभा