लहान मुलं खोटं का बोलता, यावर सर्वच पालक कायम विचार करत असतात. त्यावर वेगवेगळे उपायही शोधले जातात. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून एक नवा शोध पुढे आला आहे. खोटं बोललास तर शिक्षा करीन, अशी भीती लहान मुलांमध्ये निर्माण न केल्यास ती खरंच बोलतात, असे स्पष्ट झाले आहे.
चार ते आठ वयोगटातील ३७२ मुलांचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यामध्ये त्यांना आढळून आले की, खोटं बोलल्यास आई-वडील शिक्षा करतील, अशी भीती मनात असेल तर मुले खरं बोलण्याचे टाळतात. आई-वडिलांना काय आवडेल, असेच बोलण्यास ते प्राधान्य देतात. मात्र, आपल्याला शिक्षा होणार नाही, असा विश्वास त्यांच्या मनात असेल, तर ते खोटं बोलतच नाहीत. त्यापेक्षा वस्तुस्थिती जशीच्या तशी पालकांपुढे मांडण्याला मुलं प्राधान्य देतात.
मॅकगिल विद्यापीठातील शैक्षणिक मानसशास्त्र विभागाच्या संशोधक व्हिक्टोरिया तलवार म्हणाल्या, शिक्षेच्या भीतीमुळे कोणतंही मुलं खरं बोलते, हा गैरसमज आहे. उलट अशा भीतीमुळे मुलं खोटं बोलण्याकडे वळतात. उपजत खरं बोलण्याची मुलांची वृत्ती शिक्षेच्या भीतीमुळे बदलू शकते, असेही त्यांनी सांगितले.
कमी वयाच्या मुलांचा जास्तीत जास्त ओढा खरं बोलण्याकडेच असतो, पण वाढत्या वयाची मुलं खोटं बोलण्याला प्राधान्य देतात, असेही संशोधकांना या संशोधनात आढळून आले.