सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारनं सर्वांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. मुंबई असेल पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड सर्वच ठिकाणी आता लोकं मास्क घालून वावरताना दिसतात. पण हल्ली कोणी काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी चांदीचा करोना मास्क तयार केलेल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीचा फोटो समोर आला होता. त्यांनी चक्क ६० ग्रॅम चांदीचा एक मास्क तयार करून घेतला होता. त्याची किंमत ३ हजार ९०० रूपये इतकी होती. त्यानंतप पिंपरी चिंचवड येथील एका व्यक्तीनं साडेपाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क बनवल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता सूरतमधून अशीच एक माहिती समोर आली आहे. सूरतमध्ये सध्या हिऱ्याच्या करोना मास्कची सर्वांमध्ये क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे.

सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्यानं हिरेजडित मास्क तयार केले आहेत. सूरत हे हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, सूरतमध्ये एन ९५ सर्टिफिकेशन आणि ३ प्लाय प्रोटेक्शन मास्कची क्रेझ वाढत आहे. तसंच यामध्ये हिरेही लावण्यात आले आहे. यामध्ये खरे आणि सिंथेटिक अशा दोन्ही प्रकारचे हिरे लावण्यात आले आहेत. तसंच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे मास्क तयार करण्यात आले असून ते अनेकांच्या पसंतीसही उतरत आहेत.

नव्या मास्कची मागणी

जेव्हा ग्राहकांनी लग्न समारंभांसाठी काही वेगळं करण्याची विनंती केली त्यावेळी डोक्यात ही कल्पना आल्याची माहिती हिरे आणि सोन्याचे व्यापारी दिपक चोक्सी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. आम्ही वधू वरासाठी अशा हिऱ्यांचं मास्क तयार केलं असल्याचंही ते म्हणाले.

दीड ते चार लाख किंमत

“मास्कवर सर्वप्रथन गोल्ड कास्केट लावलं जातं. त्यानंतर त्यावर हिरे लावले जातात. सिंथेटिक हिऱ्यांच्या मास्कची रेंज दीड लाखांपर्यंत तर खऱ्या हिऱ्यांची रेंज जवळपास चार लाखांपर्यंत आहे,” असंही चोक्सी म्हणाले. ग्राहकांच्या बजेटप्रमाणे मास्कवर १५० ते ४०० हिरे लावण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.