आरोग्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

मधुमेहग्रस्तांना रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर विशेष आहार मिळणार आहे, ज्याचा त्यांच्या प्रकृतीसाठी उपयोग होऊ शकतो. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत पत्र लिहिले आहे. रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना ‘मधुमेह रुग्णांसाठीचा आहार’ या पर्यायाचाही अंतर्भाव करावा, अशी विनंती केली आहे.

१५ जानेवारीला प्रभू यांच्याशी पत्राद्वारे संवाद साधताना नड्डा यांनी मधुमेहाची तुलना आघाडीच्या आजारांपैकी एक गंभीर आजार अशी केली आहे. देशातील जवळपास सात कोटी नागरिक या विकाराने पीडित आहेत. या आजारावरील नियंत्रणासाठी दैनंदिन जीवनशैलीसोबतच पीडितांकडून घेतला जाणारा आहारही महत्त्वपूर्ण घटक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मधुमेहग्रस्त रुग्णांचा आहार हा विशिष्ट स्वरूपाचा असावाच लागतो. त्यामुळे प्रवासादरम्यान तिकिटांच्या आरक्षणावेळी जर रेल्वेतून  पुरवणाऱ्यांत येणाऱ्या आहारात व रेल्वे स्थानकांवर ‘मधुमेह रुग्णांसाठीचा आहार’ हा पर्याय उपलब्ध झाला तर तो उपयुक्त ठरेल, असेही नड्डा यांनी पत्रात आवर्जून नमूद केले आहे.

सध्या मधुमेहाचा विळखा वाढत असून २०३० पर्यंत देशभरातील मधुमेहग्रस्तांचा आकडा १० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यासाठीच आपण स्वत:हून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सद्य:स्थितीत देशातील ६२ कोटी संख्या मधुमेहग्रस्त आहेत. त्यात २०११ पासून अजून १० कोटी लोकांची भर पडलेली आहे.