महिलांना विविध क्षेत्रात आरक्षण असताना आता रेल्वेमध्येही महिलांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. महिलांसाठी रेल्वेमध्ये ठराविक जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे नुकतेच रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. वातानुकुलित डब्यात आणि स्लिपर कोचमध्ये महिलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. महिलांची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये ६ जागा राखीव असतील असे रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. केवळ महिला एकत्रितपणे प्रवास करत असतील आणि त्यांनी एकावेळी तिकीट काढली असतील तर त्या महिला या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

ही सुविधा मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी महिलांना वापरता येणार आहे. यामध्ये प्रत्येक स्लिपर कार कोचमध्ये ६ जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्यात. तसेच वातानुकुलित कोचमधील ३ जागा या वृद्ध महिला, गर्भवती महिला यांच्यासाठी राखीव ठेवाव्यात असे सांगण्यात आले आहे. या राखीव जागांवर पहिला चार्ट बनविताना बुकींग झालेली नसतील तर वेटींग लिस्टमध्ये असणाऱ्या ज्या महिला एकटीने प्रवास करत आहेत अशा महिलांना या जागा देण्यात येतील. अशा एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलाही नसतील तर ज्येष्ठ महिलांना या राखीव जागा देण्यात येतील. सध्या रतलाम विभागात हे बदल वेगाने अवलंबले जाणार असून बाकी ठिकाणी टप्प्याटप्प्याने हे बदल होतील. आता रतलाम येथून १०० रेल्वे गाड्या सुटतात तर इतर ठिकाणहून आलेल्या १५० रेल्वे याठिकाणहून जातात.