|| डॉ. शुभांगी महाजन

आता पावसाळा जवळपास सुरू झाला आहे. पावसात छान भिजावं, मज्जा करावी असं सगळ्यांनाच वाटतं; परंतु हे सगळं करत असताना आपल्या त्वचेला सुरक्षित कसं ठेवावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेचीसुद्धा विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण या दिवसात हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अतिसंवेदनशील बनते आणि त्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी किंवा जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यातील दमट हवामान जीवजंतूंसाठी पोषक असते. पावसात भिजल्यामुळे आणि  सततच्या ओलसरपणामुळे जंतुसंसर्ग झाल्यास त्वचेला खाज येणं, पुरळ उठणं, पिवळ्या फोडी येणं, बोटांच्या खोबणीत इन्फेक्शन होणं, खरूज किंवा नायट्याचे डाग अंगावर येणं यांसारख्या त्वचेच्या समस्या उद््भवू शकतात.

’ जंतुसंसर्गास आळा

पावसाळ्याच्या दिवसात भिजून आल्यावर आपली त्वचा आणि डोके कोरडे न केल्यास बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. तसेच हवेतील आद्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे जंतुसंसर्ग वाढतो. त्यामुळे त्वचा आणि केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे आणि कोरडे करावे. अंघोळीनंतर शरीराचे सर्व अवयव तपासून पाहावेत. शरीरावर कुठे पुळ्या किंवा लाल डाग तर उठले नाहीत ना हे तपासून घ्यावे. पायाच्या बोटांमध्ये टिश्यू पेपर किंवा सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून त्वचा कोरडी करावी. डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य ती क्रीम आणि पावडर अंगावर लावू शकता. स्वच्छ धुतलेले आणि कडक इस्त्री केलेले कपडे वापरावेत. जाड कापडाचे, पटकन न वाळणारे कपडे घालणं टाळावं. पावसाळ्यात बूट, मोजे घालणं टाळावं. सँडल्स किंवा फ्लोटर्सचा वापर करावा.

’ कोरडी त्वचा

पावसाळ्यात त्वचा संवेदनशील बनते. त्यामुळे कोरडी त्वचा अधिकच कोरडी भासू लागते. कोरडी त्वचा डिहायड्रेशनमुळे अधिक निस्तेज दिसते. म्हणून प्रत्येक वेळी चेहरा धुतल्यानंतर किंवा अंघोळीनंतर चांगल्या प्रतीच्या मॉइश्चरायझरचा वापर करावा. तसेच चेहरा धुताना आणि अंघोळीदरम्यान दूध, मध किंवा ग्लिसरीनयुक्त फेस वॉश अथवा साबण वापरावा.

’ तेलकट त्वचा

तेलकट त्वचा अधिक तेलकट होण्यापासून वाचविण्यासाठी दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा मेडिकेटेड फेस वॉशने चेहरा धुवावा आणि त्यानंतर वॉटर बेस असलेल्या ऑइल फ्री (लोशनफॉर्म) मॉइश्चरायझरचा वापर करावा. तेलकट त्वचा असल्यास पावसाळ्यात खूप मेकअप करू नये, नाही तर मुरूम होण्याचा धोका संभवतो.

’ तेलकट आणि कोरड्या त्वचेचं मिश्रण असलेली त्वचा

अशा त्वचेला पावसाळ्यात जास्त त्रास होत नाही. मात्र जर तेलकटपणा किंवा कोरडेपणा जाणवला तर त्यानुसार त्यावर उपचार करावेत. अशा प्रकारच्या त्वचेला क्लिंझिंग आणि टोनिंग उपयुक्त ठरतं. तसेच चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चराइजर लावणं आवश्यक आहे.

’ चेहऱ्यासाठी क्लिंझर, टोनर आणि स्क्रबचा वापर

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नियमित क्लिंझिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्वचेच्या आतील छिद्रं मोकळी होतात आणि त्वचेला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसेच चेहरा टवटवीत आणि नितळ दिसायला मदत होते. टोनर उरलेली घाण, धूळ आणि मेकअप काढून चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ करते आणि त्वचा घट्ट करते. चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस स्क्रबचा वापर करणं उपयुक्त ठरतं.

’ मॉइश्चराइजर आणि सनस्क्रीनचा वापर

पावसाळ्यात त्वचा स्वच्छ राहावी म्हणून वारंवार त्वचा धुतली जाते. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते. म्हणून त्वचा धुतल्यावर त्यावर मॉइश्चराइझर लावणं महत्त्वाचं आहे. त्वचेला नियमित मॉइश्चराईझ केल्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होतं आणि त्वचेमधील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्वचा अधिक मऊ, मुलायम आणि सतेज दिसते. पावसाळ्यात मॉइश्चराइजरसोबतच सनस्क्रीनचा वापरही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण वातावरण जरी ढगाळ असलं तरी वातावरणात सूर्याच्या अतिनील किरणांचं प्रमाण तेवढंच असतं. म्हणून घराबाहेर पडताना एखादं चांगल्या दर्जाचं आणि ३० किंवा त्यापेक्षा अधिक एसपीएफ असलेलं सनस्क्रिन लोशन जरूर लावावं. ज्यामुळे त्वचेचा सुरकुत्या आणि टॅनपासून बचाव होईल.

’ केसांची काळजी

पावसात ओले झाल्यावर केस स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. मात्र त्यासाठी ड्रायरचा सारखा वापर करणं टाळावं. त्यामुळे डोक्यात खाज येणं, कोंडा होणं यासारख्या समस्यांना आळा बसतो. केस धुतल्यावर केसांना कंडिशनर आणि सिरम नक्की लावावं.

’ ओठांची काळजी

पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे तुमचे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. यासाठी सतत ओठांना लिप बाम लावण्यास विसरू नका.

’ जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा

त्वचेला ताजे टवटवीत ठेवण्यासाठी मुबलक पाणी प्या. पावसाळ्यात तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पिऊ  नका. शरीराला आणि त्वचेला पाण्याची आवश्यकता असते ती भरून काढणं गरजेचं असतं. या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतलीत तर पावसाळ्यात आपल्या त्वचेचं रक्षण करू शकाल आणि त्वचेला टवटवीत ठेवू शकाल.