08 March 2021

News Flash

… म्हणून साजरा करतात रक्षाबंधन, जाणून घ्या बहिण-भावाच्या सणामागील आख्यायिका

प्रदेशागणिक कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे

 

भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी यंदा रक्षाबंधनाचा हा सण आहे. श्रावणातल्या या महत्त्वाच्या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशागणिक कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे.  रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात काíतकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. वैदिक काळात पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.

पौराणिक काळातील अशीही एक कथा आहे. दैत्य राजा बलीकडे विष्णू आला तेव्हा शुक्राचार्यानी बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. रक्षासूत्रापासूनच पुढे राखीची प्रथा आली असावी. द्रौपदीने आपला भरजरी पितांबर फाडून कृष्णाच्या करंगळीवर चिंधी बांधली आणि कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले अशी कथा आहे. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी द्रौपदी आणि कृष्णाचे बंधूप्रेमाचे अप्रूप दिसून येते.

सिकंदर जेव्हा हिंदुस्थानावर(भारत) चाल करून आला, त्या वेळी तो झेलम नदीच्या किनारी पोहोचला. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेथे झेलम नदीच्या किनारी सावित्री नावाची एक स्त्री राखीची पूजा करून जलदेवतेला अर्पण करीत होती. हे दृश्य पाहून सिकंदर आश्चर्यचकित झाला. त्याने सावित्रीला राखीसंबंधी विचारले. सावित्रीने राखीचे महत्त्व सांगितले आणि त्याच्या मनगटावर बांधली. त्यांचे बहीण-भावाचे नाते निर्माण झाले. पुढे सिकंदराने पोरस राजावर चाल करून त्याला कैद केले. ही घटना पोरसाची सख्खी बहीण सावित्रीला कळताच, ती तत्परतेने सिकंदराकडे आली आणि तिने त्याला रक्षाबंधनाची आठवण करून दिली. सिकंदरला ती पोरसाची बहीण आहे हे कळताच त्याने तिची क्षमा मागितली व पोरसाला कैदेतून मुक्त केले आणि त्याचे राज्य परत दिले. याची बरीच उदाहरणे आहेत.

 राखी बांधताना बहिणीने म्हणावे – येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥ (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते.

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे.  ‘राखी’ हा शब्द रक्ष या संस्कृत धातूपासून झाला आहे. याचा अर्थ ‘रक्षण कर’ – ‘राख म्हणजे सांभाळ’. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वत: सर्वाना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गíभत अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे, असे पूर्वी मानत असत. धर्म म्हणजे धारणा करणारा. समाज, देश धारणेसाठी सर्वाचे रक्षण करणे हा याचा अनुस्यूत अर्थ आहे.

मूळ लेख वाचण्यासाठी इथं क्लीक करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:54 pm

Web Title: raksha bandhan 2020 importance significance and history of rakhi festival raksha bandhan history in marathi nck 90
टॅग : Raksha Bandhan
Next Stories
1 रक्षाबंधनाला बहिणीला खास गिफ्ट द्यायचंय? मग हे पर्याय पाहाच
2 आंबट-गोड चिंच खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे नक्की जाणून घ्या
3 लॉकडाउन इफेक्ट : टेलिकॉम कंपन्यांनी एप्रिल महिन्यात गमावले ८२ लाख ग्राहक
Just Now!
X