खाऊ आनंदे
रश्मी करंदीकर – response.lokprabha@expressindia.com
रमजान हा मुस्लीम बांधवांचा रोजे पाळण्याचा महिना. ते पाळताना सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर जी खाद्यपदार्थाची रेलचेल असते, त्यातून एका वेगळ्याच खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडतं.

रमजान हा इस्लाममधील पवित्र महिना. त्याला मुस्लिम धर्मात फार महत्त्व आहे. त्यामुळेच हा महिना फार उत्साहात साजरा केला जातो. या महिन्याची सुरुवात चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मुस्लीम बांधव रोजे ठेवतात. रोजा म्हणजे उपवास. सूर्योदयाच्या आधी न्याहारी करून सूर्यास्तानंतर जेवणे. या दरम्यान अन्न, पाणी पिणे वज्र्य असते.

माझी सुरुवातीच्या काळातील सात वर्ष भिवंडीमध्ये गेली. भिवंडी हे शहर मला नेहमी ‘मिनी भारत’ वाटते. भारतातल्या सर्व भागातले लोक या शहरात वसलेले आहे. मुंबईनंतर मी पाहिलेले हे दुसरे शहर आहे, जे रात्रभर जागे असते. रमजानच्या काळात तर मला भिवंडीची हटकून आठवण येते. मार्केटमधली ती रोषणाई, मीनाबाजार, माणसांची चहलपहल… भिवंडीमध्ये एकाहून एक खास चवीचे पदार्थ बनवणारे खानसामे आणि आपा, बुआ, फुफी, नानी, चाची तुम्हाला घराघरांत आढळतील. भिवंडीकरांचे वैशिष्टय़े म्हणजे ते फार प्रेमाने तुम्हाला खाऊ घालतात. भिवंडीमध्ये खूप प्रेमाने खाऊ घालणाऱ्या समस्त आपा, दादीची मी कायम ऋणी राहीन. मी शाकाहारी म्हणून गुरुवारी खास साजूक तुपातली पुरणपोळी खाऊ घालणारी नदीम भाईची अम्मी जानची मूर्ती आजही डोळ्यासमोर उभी राहाते. हैद्राबादच्या प्रसिद्ध पॅरेडाइजची बिर्याणी खाल्ल्यानंतरही जगातील सर्वोत्तम बिर्याणी आमच्या भिवंडीतला आसिफभाई बनवतो याबद्दल माझ्या मनात तीळभरही शंका नाही.

रमजानचा नूर भिवंडीमध्ये पाहाण्यासारखा असतो. घराघरांत इफ्तारी आणि सेहरीची तयारी अगदी जय्यत सुरू असते. आणि या सर्व महिन्याची सांगता म्हणजे रमजान ईद.

शीर खुर्माची तयारी तर आदल्या रात्रीपासून सुरू होते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेवयांचे रचलेले ढीग, ड्रायफ्रुटस, खजूर भिवंडीच्या बाजारात तुम्हाला याकाळात दिसतील. त्यानंतर महत्त्वाचं ठिकाण म्हणजे दूधनाका. अक्षरश: हजारो लिटर दुधाची विक्री एकटय़ा रमजान ईदच्या दिवशी कल्याण आणि भिवंडीच्या दूधनाक्यावर होते. काही काही घरांमध्ये अगदी ४०-५० लीटर शीर खुर्मा फार निगुतीने बनवतात आणि त्यासाठी दुधाचे विक्रेतेही पिढय़ा न् पिढय़ा ठरलेले असतात.

मला तर रमजान ईदच्या जेवणाचा थाट फार आवडतो. ‘थाल’ भरून एवढे पदार्थ इतक्या नजाकतीने मांडलेले असतात की केवळ नजरेने पोट भरावं. मला यात विशेष कौतुक वाटतं ते तमाम महिला वर्गाचं. सकाळी दहापासून ईदच्या शुभेच्छा देण्याकरिता एकमेकांच्या घरी जाण्याची सुरुवात होते. अगदी नऊपासूनच टेबलावर सर्व पदार्थ हिरिरीने मांडून ठेवलेले असतात. प्रत्येक घरच्या शीरखुर्माची चव वेगळी. सुरुवातीला  माझ्यासाठी शाकाहारी पदार्थाचे वेगळे ‘थाल’ सजवलेले असायचे. राजेळी केळी, केळ्याचा शाही हलवा, आलू चाट, शाही ड्रायफ्रूटवाला चिवडा, मसाला बदाम, बदाम शरबत आणि शाही फालुदा यासारखे अनेक शाकाहारी पदार्थ मी माझ्या भिवंडीतल्या खाद्ययात्रेत चाखले. अर्थात भिवंडीमध्ये तुम्हाला हे कुठे स्ट्रीट फूड म्हणून मिळणार नाही त्याकरिता तुम्ही आधी भिवंडीकरांचं  हृदयात स्थान मिळवायला हवं मग रमजान ईदला तुम्हाला आमंत्रण खास मिळणारच.

मुंबईत रमजानच्या खाद्यभ्रमंतीसाठीची खास जागा म्हणजे मोहम्मद अली रोड. रमजानच्या काळात इफ्तारी, सेहरीकरिता खास मोहम्मद अली रोडची सैर करायला हरकत नाही. वीकेंडला तुम्हाला मोहम्मद अली रोडच्या चिंचोळ्या गल्लीमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही. फक्त मांसाहारी नाही तर शाकाहारींनादेखील इथे खाण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: गोड खाणाऱ्याकरिता इथे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. नॉन व्हेज खाणाऱ्यासाठी तर तिथे पर्वणीच असते. मासे, मटणाचे, चिकनचे वेगवेगळे प्रकार मोहम्मद अली रोडच्या खाऊ गल्ल्यांमध्ये खायला मिळतात. रमजानच्या खाद्ययात्रेला जाताना त्या दिवशीचं जेवण केलं नाही तरच त्या सर्व पदार्थाना न्याय देता येईल.

मोहम्मद अली रोडला गेल्यावर वेगवेगळ्या पदार्थाच्या वासानेच तुमची भूक चाळवेल. हिंदुस्थान रेस्टॉरंटच्या बाजूला गरमागरम नान सॅण्डविच, चिकन रोल, बैदा रोटी अशा खाद्यपदार्थाची रेलचेल दिसून येईल. थोडे पुढे गेल्यावर क्रिस्पी चिकन, चिकन सतायच्या व्हरायटीज मिळतील. चिकन टिक्का, चिकन हरियाली, शीग कबाब, चिकन कबाबचे वेगवेगळे प्रकार या खाद्ययात्रेत चाखायला मिळतील. किंग्ज श्वार्मामध्ये गरमागरम श्वार्मा पराठय़ासोबतचखाता येईल. जनता रेस्टॉरंटसमोरच्या गाडीवर कलेजी फ्राय, गुद्दा मसाला, भेजा फ्राय, भेजा मसाला अशा असंख्य व्हरायटी चाखता येतील.

गरमागरम मालपुवा जेव्हा कढईतून निथळून बाहेर येतो, तेव्हा त्याचा खरपूस सोनेरी रंग पाहण्यासारखा असतो. मोहम्मद अली रोडवर रमजान खाद्ययात्रेत हा मालपुवा न खाणे म्हणजे आपल्या अधिक महिन्यात अनारसे न खाण्यासारखंच!

अर्थात हा मालपुवा खाण्याची पण एक पद्धत आहे. येथे बरेच जण मालपुवा रबडी बरोबर खातात. पण अस्सल खवैय्या गरमागरम मालपुवा हा जाड मलईबरोबर खातो. तुपात निथळलेला सोनेरी रंगाचा मालपुवा आणि त्यावर जाड, पांढरीशुभ्र मलई अहाहा.. हे कॉम्बिनेश्नच तुफान आहे. अर्थात हा अख्खा मालपुवा एकटय़ाने खाऊ नका. नाही तर पुढच्या पदार्थासाठी तुमच्या पोटात जागाच शिल्लक राहणार नाही.

हबीब मस्जिदच्या लेनमध्ये तुम्हाला केशरी रंगाच्या हलवा-पराठय़ाच्या गाडय़ा दिसतील. क्रिस्पी गरम पराठय़ासोबत मऊ लुसलुशीत हलवा नक्कीच खाऊन बघा.

सुरती बारा हंडीच्या इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सामिष पदार्थ चाखता येतील. चुना  मस्जिदच्या मुख्य दरवाजासमोर चिकन लेग फ्रायच्या गाडय़ा दिसतील. इथेही तुम्ही पुदिन्याच्या तिखट चटणीसोबत चिकन फ्राय लेगचा आस्वाद घेऊ शकता.

जे. जे. जिलेबी हा अस्सल खवय्याचा अजून एक पॉइंट. आतापर्यंत तुम्ही केशरी नाहीतर पिवळी कुरकुरीत जिलेबी टेस्ट केली असेल. या दुकानासमोर थाळीमध्ये रचलेली काळसर चॉकलेटी रंगाची जिलेबी प्रथमदर्शनी तुम्हाला आवडणार नाही परंतु माव्याचा खरपूस वास तुम्हाला ती टेस्ट करायला भाग पाडेल. गरमागरम पाकातली अस्सल बुऱ्हानपुरी जिलेबी म्हणजे जिलेबीच्या रूपात अवतरलेला खव्याचा गुलाबजाम असं म्हणायला हरकत नाही. अर्थात इथे अस्सल मावा गुलाबजाम देखील मिळतात.

नूर मोहम्मदी हॉटेलची नल्ली नहारी नक्कीच खायला हवी. इथे मोघलाई डिशेसही छान मिळतात. चिकन संजूबाबा (अभिनेता संजय दत्तने सांगितलेली रेसिपी) आणि दाल गोश्त इकडची यूएसपी आहे. हे सगळं वाचून शाकाहारी लोकांनी बिलकूल नाराज होऊ नये. रात्रभर मंद आचेवर शिजवून तयार केलेली ‘दाल घी’ तंदूरी रोटीबरोबर गरमागरम खाण्याची मजा काही औरच आहे.

यानंतर तुम्ही ताज आइस्क्रीमकडे मोहरा वळवू शकता. १४५ वर्षांची परंपरा असलेले हे आइस्क्रीमचे दुकान. आजही इथे हाताने फिरवलेल्या मशीनवर तयार केलेले ताज्या फळांचे आईस्क्रीम खायला मिळेल. मोसमानुसार फळांचे आईस्क्रीम फ्लेवर्स नक्की टेस्ट करा.

‘तवक्कल स्वीट’ हे अजून एक मिठाईचे दुकान. मालपुवा, फिरनीचे विविध प्रकार, फेणी, मावा पॅटीस, दुधी हलवा या इथल्या स्पेशालिटी. बद्रीस कोल्डिंक सेंटरमध्ये तुम्ही २० प्रकारचे वेगवेगळे सोडा फ्लेवर्स टेस्ट करू शकता. येथील कोकम मसाला सोडा मस्त टँगी चवीने जिभेवर रेंगाळतो. सुलेमान मिठाईवाला हे एक मोहम्मद अली रोडवरचे आणखी एक बडे प्रस्थ. रमजानमध्ये इकडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी, फिरनी चाखण्यासारख्या आहेत. केक आणि बेकरी आयटमही इथे फ्रेश मिळतात. इथले ‘अफलातून’ नक्की पार्सल करून घ्या. एक अफलातून तुम्ही खाल्ले तर पुढचे दोन तास तुम्ही काहीही खाऊ शकणार नाही. साजूक तुपात थबथबलेले खरपूस ‘अफलातून’ ही खास मिठाई अनुभवण्याची चीज आहे. ती एखाद्या रविवारी मस्त जेवणानंतर खाण्याची राजेशाही स्वीट डीश आहे. अफलातूनचा तुकडा अलगद जिभेवर ठेवावा, त्यातील गोडवा मस्तपैकी एन्जॉय करावा, मग त्याच्या चवीची नशा हळूहळू मेंदूपर्यंत चढते आणि पुढचे दोन – तीन तास त्याच सुखात आपण निद्रादेवीच्या स्वाधीन होतो. इस्टंट झोपेसाठी ‘अफलातून’ खाल्लंच पाहिजे.

परत एकदा मोहम्मद अली रोडच्या खाद्ययात्रेकडे वळू. ‘‘पाया’’ हा अतिशय टेस्टी प्रकार या ठिकाणी खायला मिळतो. वलीभाई पायावाला (शालिमार पॉइंट समोर) या ठिकाणाला १३२ वर्षांची परंपरा आहे. येथील पाया शोरबा नक्की चाखून पहा. यानतंर तुम्हाला मसालेदार  खाण्यातून थोडी सुटका पाहिजे असेल तर नूराणी मिल्क सेंटरला भेट द्या. तेथील मसाला मिल्क, बदाम मिल्क, फिरनी सर्व एकसे बढकर एक आहेत. ‘संदल’ हा अजून एक गोड पदार्थ तुम्हाला रमजानच्या दरम्यान इथे खायला मिळेल.

रमजानच्या दरम्यान बडेमियाँचा देखील स्टॉल मिनारा मस्जिद जवळ लागतो. इथे तुम्ही बैदा रोटी, चिकन भुना, चिकन टिक्का, कबाबच्या वेगवेगळ्या व्हरायटी, पाया सूप, मटन सूप ट्राय करू शकता.

रमजानच्या दरम्यान नक्की चाखण्याची अजून एक सामिष डीश म्हणजे ‘हलीम’. साजूक तुपात बनलेला हा हलीम, वर तळलेला कांदा पेरून लिंबाच्या फोडीसह तुमच्या समोर पेश करतात. या सर्व डिशेस अस्सल खानसाम्याने बनवलेल्या खाण्यात खरी मजा आहे.

भेजा फ्राय, कलेजी फ्राय, खिमा, कबाब, पाया शोरबा, नल्ली नहारी, बैदा रोटी.. अशा अनेकविध समिष पदार्थाची चव चाखून झाल्यावर केशर आणि केवडा मिश्रित फिरनी मातीच्या कुल्हडमधून चाखावी. त्यात जी थोडीशी मातीची चव लागते ति जीभेवर रेंगाळत या खाऊगल्लीचा निरोप घ्यावा..

अर्थात पुढच्या रमजानला इथे परत भेटू असं वचन देत!
सैजन्य – लोकप्रभा