व्यक्तीला सक्रिय, समाधानी, कार्यशील बनविण्यासाठी काय गरजेचे असते? यश, पैसा, संपत्ती, सन्मान, प्रसिद्धी की आणखी दुसरे काही? अमेरिकेच्या जॉर्जिया भागात केवळ संशोधन या उद्देशाने उभारण्यात आलेल्या इमॉरी विद्यापीठाच्या मते वरील कुठल्याही बाबी मेंदूला कार्यशील बनविण्यास उपयुक्त ठरत नाही, तर चांगल्या कादंबरीच्या वाचनाने व्यक्तीला कार्यशील बनविण्याइतपत मेंदू तल्लख बनतो. अभ्यास गटाने विद्यार्थी समूहावर कादंबरीच्या वाचन उपयुक्ततेबाबत प्रदीर्घ अभ्यास केला.  त्यांच्या मते कुठल्याही पुस्तकातील कथनशैली ही मेंदू क्रियाशील करण्यास उपयुक्त ठरते. भाषा शिकण्यासाठी माणसाला महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मेंदूच्या डाव्या टेम्पोरल कॉर्टेक्स पुस्तक वाचनामुळे क्रियाशील होतात.
वाचनाने नक्की काय होते?
अभ्यास गटाचे प्रमुख लेखक ग्रेगरी बर्नस यांच्या मतेकादंबरी वाचनामुळे मेंदूच्या सेंट्रल सल्कस या भागातही जास्त क्रियाशीलता दिसून येते. हा भाग आपल्या शरीरातील अवयवांच्या हालचालींचे नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेत प्राथमिक संवेदक म्हणून काम करीत असतो. या भागातील न्यूरॉन्स म्हणजे एक प्रकारच्या चेतापेशी शरीराच्या संवेदन क्षमतेशीही निगडित असतात. हे बदल आपल्या संवेदनशीलतेशी एवढे निगडित असतात की कादंबरी वाचल्यानंतर त्यातील कथानक वाचकाच्या मानसिकतेत वावरते. चार ते पाच दिवस त्यामुळे न वाचणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक सक्रिय, अधिक समाधानी आणि कार्यशील असते. ब्रेन कनेक्टिव्हिटी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.