Realme कंपनीने गेल्या महिन्यात भारतामध्ये आपल्या नवीन Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या दोन स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. यातील Narzo 10 हा स्मार्टफोन आज(दि.8) पुन्हा एकदा भारतात सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.

फ्लिपकार्ट आणि Realme.com या संकेतस्थळांवर दुपारी 12 वाजेपासून हा फोन सेलमध्ये खरेदी करता येईल. सेलमध्ये काही आकर्षक ऑफरही आहेत. अ‍ॅक्सिस बँकेच्या बझ क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. तर, रिअलमीच्या संकेतस्थळावरुन MobiKwik अॅपद्वारे हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 500 रुपये सुपरकॅश मिळेल. तसेच, ग्राहकांना नो-कॉस्ट इएमआयचाही पर्याय उपलब्ध आहे.

यापूर्वी पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांनी शानदार प्रतिसाद दिला होता. तीन मिनिटांमध्येच तब्बल 70 हजार Narzo 10 स्मार्टफोनची विक्री झाली असा दावा कंपनीने केला होता. त्यावेळी फक्त 128 सेकंदांमध्ये Narzo 10 फोनच्या 70 हजार युनिट्सची विक्री झाली, अशी माहिती रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी दिली होती.

Realme Narzo 10 स्पेसिफिकेशन्स आणि किंमत:-
Realme Narzo 10 ग्रीन आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये खरेदी करता येईल. Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. MediaTek Helio G80 चिपसेटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी यामध्ये आय-केअर मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सुपर नाइटस्केप मोडचाही पर्याय यामध्ये युजर्सना मिळेल. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल. 11 हजार 999 रुपये इतकी Narzo 10 या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ठेवली आहे.