काही दिवसांपूर्वीच स्मार्टफोन बनविणाऱ्या रिअलमी कंपनीने भारतात पहिला 5जी स्मार्टफोन( Realme X50 Pro) लाँच केलाय. त्यानंतर आता कंपनी भारतात लवकरच कमी किंमतीतील 5जी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी याबाबत माहिती दिली.

कंपनीला 2020 पर्यंत भारतातून होणारे उत्पन्न दुप्पट होऊन 30 हजार कोटी रुपये होईल अशी अपेक्षा आहे. कंपनीने स्मार्ट टीव्ही, स्मार्ट ब्रँड, स्मार्ट वॉच आणि अनेक प्रोडक्ट लाँच करण्याची योजना कंपनीने आखली आहे. या नव्या प्रोडक्ट्समुळे कंपनीला वर्षाच्या अखेरपर्यंत 3 हजार कोटी रुपये किंवा 10 टक्के उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती सेठ यांनी इकॉनॉमीक टाइम्सशी बोलताना दिली.

“रिअलमीने 30 हजार रुपयांपेक्षा महाग, भारतातील पहिला 5जी स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र, वेळेनुसार विविध रेंजमधील 5जी स्मार्टफोन आणणार आहोत. आम्ही नंतर स्वस्तातील 5 जी स्मार्टफोन लाँच करणार आहोत. 5जीसाठी आमच्याकडे अनेक चिपसेट आहेत. पण, ग्राहकांना दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी पहिल्या फोनमध्ये फ्लॅगशिप चिपसेटसोबत सुरूवात करायची होती. आता 5जी फोनचं प्रोडक्शन वाढवण्याऐवजी आम्ही ग्राहकांच्या प्रतिक्रियेकडे जास्त लक्ष देत आहोत. टेक्नॉलॉजीची आवड असलेल्यांकडून या फोनबाबत जो फिडबॅक येईल तो महत्त्वाचा असेल”, असं सेठ म्हणाले. रिअलमी इंडियाने 2019 मध्ये जवळपास 150 लाख स्मार्टफोन विकले होते. या वर्षी हा आकडा 300 लाख युनिटपर्यंत नेण्याचा कंपनीचं लक्ष्य आहे.