तब्बल 25 मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा रिअलमी यू 1 या स्मार्टफोनचा आज(दि.5) भारतात पहिल्यांदाच सेल आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉन आणि Realme.com या अधिकृत संकेतस्थळावर सेल सुरू झाला आणि अवघ्या सहा मिनिटांतच हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक झाला. स्मार्टफोनच्या 2 लाख 5 हजार 400 युनिटची अवघ्या सहा मिनिटात विक्री झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे कंपनीने संध्याकाळी पुन्हा एका सेलचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून हा सेल सुरू होत असून यात 1 लाख युनिट विक्रीसाठी उपलब्ध असतील.

गेल्या अनेक दिवसांपासून हा स्मार्टफोन चर्चेत आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामधील फ्लॅगशिप चिपसेट मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर. इतकं तगडं प्रोसेसर असणारा हा जगातला पहिलाच स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जातंय. अन्य दर्जेदार फिचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये सोनी कंपनीचे आयएमएक्स 576 हे सेन्सर असून यात एफ/2.3 अपर्चर आहे. यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता (किंवा ब्युफिफाय प्रणाली) म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(एआय) आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसोबत एआय फेस अनलॉक फिचरदेखील देण्यात आले आहे.

बुधवारी (दि. 28) नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात आलाय. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. अनुक्रमे 11 हजार 999 आणि 14 हजार 999 रुपये इतकी याची किंमत असणार आहे. अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 5 डिसेंबरपासून या फोनची विक्री सुरू होत आहे. अॅम्बिशस ब्लॅक, ब्रेव्ह ब्ल्यू आणि फिअरी गोल्ड या तीन कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.

25 मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेऱ्याशिवाय मागील बाजूला 13 आणि 2 मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अँड्रॉइडच्या ओरियोवर आधारित कलरओएस ५.२ या प्रणालीवर हा फोन कार्यरत असेल. याशिवाय 6.3 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि 3 हजार 500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.