रिअलमी कंपनीने आपला Realme X2 Pro हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. याद्वारे शाओमीच्या Redmi K20 Pro आणि वनप्लसच्या OnePlus 7T स्मार्टफोनला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. Realme कंपनीचा प्रीमियम सेगमेंटमधील हा पहिलाच स्मार्टफोन आहे. यात दर्जेदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून मागील बाजूला असलेला चार कॅमेऱ्याचा सेटअप याचं वैशिष्ट्य आहे. भारतात हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

फीचर्स –
स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये दर्जेदार टचसाठी 135Hz टच सॅम्पलिंग आहे. गेमिंगसाठी यामध्ये लिक्विड कूलिंग फीचर आहे. 50W VOOC फास्ट चार्जिंगसह 4,000mAh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये दर्जेदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 6.5-इंच फुल-HD+(2400 x 1080 पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले यात आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 64MP क्षमतेचा आहे. तर अन्य कॅमेरे अनुक्रमे 8MP क्षमतेचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 13MP क्षमतेचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. याशिवाय फोनमध्ये अपडेटेड इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा वापर करण्यात आला आहे. रिअलमीने या फोनमध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर सेटअप दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड WiFi असून ColorOS 6.1 वर स्मार्टफोन कार्यरत असेल. याशिवाय सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.

आणखी वाचा- ‘जिओ’ची कमाल, जगातील पहिली ‘एआय’ आधारित व्हिडीओ असिस्टंस सेवा सादर

किंमत – हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिअंट आणि एका विशेष आवृत्तीसह लाँच करण्यात आला आहे. यातील 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमधील चलनानुसार 2,599 युआन (जवळपास 25,990 रुपये), 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2,799 युआन( जवळपास 27,990 रुपये) आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 3,199 युआन (जवळपास 31,990 रुपये) आहे. तर, Realme X2 Pro मास्टर एडिशनची किंमत 3,299 युआन (जवळपास 32,990 रुपये) ठेवण्यात आली आहे.