डोळ्यांखाली काळी वर्तुळं (डार्क सर्कल) यायला लागली की आपण हैराण होतो. माझा चेहरा यामुळे कीती खराब दिसतोय, चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाल्यासारखे वाटतेय. आता ही काळी वर्तुळं येण्यामागची अनेक कारणे असतात. तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळं तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि इतर काही कारणांनी ही काळी वर्तुळं निर्माण होतात.

ही वर्तुळं घालविण्यासाठी मग बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरली जातात. त्यातील घटकांची योग्य ती माहिती नसल्याने ही उत्पादने अनेकदा त्वचेसाठी घातक ठरु शकतात. मात्र केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार व्हायला हवा. हे एखाद्या आजाराचे सूचक लक्षण असू शकते. त्यामुळे ही वर्तुळे कशाने तयार झाली यांच्या मूळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत. अशाप्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते. तरीही डोळ्याखाली वर्तुळं येत असतील तर त्यामागील कारणे समजून घ्या…

१. आयर्नची कमतरता – चांगल्या आरोग्यासाठी शरीरात पुरेसे आयर्न असणे आवश्यक असते. यामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. पेशींना हा ऑक्सिजन योग्य त्या प्रमाणात न मिळाल्यास काळी वर्तुळं येतात. ही समस्या सोडवायची असल्यास अतिशय सोपा उपाय आहे. आहारात हिरव्या भाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश वाढवावा.

२. रडणे – रडणे हे डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांचे एक मोठे कारण आहे. रडण्यामुळे डोळ्यातील आर्द्रता कमी होते आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.

३. अतिझोप – कोणतीही गोष्ट अती केली की ती त्रासदायकच असते. त्याचप्रमाणे पुरेशी झोप गरजेची असते असे म्हणत असतानाच अती झोप काळ्या वर्तुळांना आमंत्रण देणारी ठरु शकते. जास्त झोप झाल्यामुळे चेहऱ्यामध्ये एक प्रकारचा द्राव साचून राहतो आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही अती झोपत असाल तर ते टाळा.

४. सतत उन्हात फिरणे – तुम्हाला कामामुळे किंवा इतर कारणांनी सातत्याने उन्हात राहवे लागत असेल तर त्यामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. उन्हामुळे शरीरातील मेलालीनची पातळी वाढते आणि त्वचा काळवंडते. त्यामुळे काळी वर्तुळे दिसायला लागतात.

५. अति प्रमाणात मीठ खाणे – जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते असे आपण सर्रास ऐकतो. मात्र जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. त्यामुळे आपल्या आहारातील मीठाचे प्रमाण तपासून पाहणे गरजेचे आहे.