गेले काही दिवस मोबाईल प्रेमींमध्ये चर्चा रंगलेली आहे की शाओमी ही कंपनी रेडमीचा पॉपअप कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात आणणार का? रेडमीच्या नुकत्याच दाखल झालेल्या सेव्हन प्रो नोटला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पॉप अप कॅमेरा शाओमी आणते का याकडे सगळ्यांचं सक्ष लागलेलं आहे. याला कारणही तसंच आहे. या महिन्याच्या सुरूवातीला रेड मी प्रो २ या स्मार्टफोनचा पॉप अप कॅमेरा असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. अर्थात, तो फेक असल्याचं लगेचच सांगण्यात आलं होतं. परंतु त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता मात्र चाळवली गेली.

या आठवड्यात पुन्हा एकदा असंच एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि रेड मीचा खरंच पॉप अप कॅमेरा फोन येतोय अशी चर्चा सुरू झाली. या फोटोमध्ये रेड मीचा पॉप अप कॅमेरा कसा असेल याची झलक दिसते. विशेष म्हणजे लीक झालेला हा फोटोही डिलीट करण्यात आला आहे. हा फोटो म्हणजे एमआय ९ एसई असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या फोटोमध्ये बाटल्या दिसतात परंतु नीट बघितलं तर मागे एक स्मार्टफोन दिसतो ज्याच्या एका बाजुनं कॅमेरा पॉप झालेला आहे. हा फोटो डिलीट करण्यात आला.

तज्ज्ञांचा असा दावा आहे की रेड मी नक्कीच पॉप अप कॅमेरा असलेला फोन दाखल करेल परंतु तो कसा असेल याबाबत सांगता येत नाही. काहीजणांच्या मते तो रेड मी सेव्हन नोट प्रो प्रमाणे ४८ मेगापिक्सेलच्या कॅनेऱ्याप्रमाणे असेल. या क्षेत्रातल्या जाणकारांच्या मते याच महिन्याच्या अखेरीस हा गुढ फोन बाजारात दाखल होईल. शाओमीनं मात्र आत्तापर्यंत इतकंच जाहीर केलंय की भारतात २४ एप्रिल रोजी रेड मीचा वाय सीरिजमधला फोन सादर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे रेड मीचे जनरल मॅनेजर लू वेबिंग यांनी रेड मीचा स्नॅपड्रॅगन ८५५ असलेला फोन दाखल होईल असं सांगितलं आहे. रेड मी सध्या भारतात प्रचंड लोकप्रिय असलेला ब्रँड असून नक्की कुठला फोन दाखल होणार आहे आणि तो पॉप अप कॅमेरा असलेला असेल का हे लवकरच स्पष्ट होईल.