अमेरिकी संशोधकांचा दावा
आहारात लाल रंगाचे मांस अनेक वेळा सेवन करणाऱ्या मुलींना त्यांच्या वयाच्या मानाने मासिक पाळी लवकर येते. या मुलींचा मासिक पाळी सुरू होण्याचा कालावधी हा असा आहार न घेणाऱ्या मुलींच्या तुलनेत पाच महिने अगोदरपासून सुरू होत असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर आकाराने जाड असलेल्या माशांचे सेवन (टय़ुना किंवा सरडिनेस) प्रत्येक आठवडय़ातून किमान एकदा तरी आहारात करणाऱ्या मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचा कालावधी हा अशा प्रकारचा आहार महिन्यातून फक्त एकदाच किंवा त्यापेक्षाही कमी वेळा करणाऱ्या मुलींच्या तुलनेत उशिरा येत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
कोलंबियातील ५ ते १२ वयोगटातील ४५६ मुलींना मासिक पाळी सुरू होण्याच्या पूर्वी घेत असलेल्या आहाराचे परीक्षण मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांकडून सहा वर्षे करण्यात आले. तसेच या कालावधीदरम्यान त्यांना मासिक पाळीबाबत देखील विचारणा करण्यात आली.
या वेळी आठवडय़ातून किमान चार वेळा आणि दिवसातून दोनदा लाल रंगाचे मांस सेवन करणाऱ्या मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचा कालावधी हा वयाच्या १२ व्या वर्षी ३ महिन्यांत आला, तर त्यापेक्षा कमी वेळा सेवन करणाऱ्या मुलींमध्ये मासिक पाळी वयाच्या १२ व्या वर्षी ८ व्या महिन्यात आल्याचे दिसून आले.
तर संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आकाराने जाड असलेल्या माशांचे आहारात सेवन करणाऱ्या मुलींना वयाच्या १२ व्या वर्षी ६ व्या महिन्यात मासिक पाळी सुरू झाल्याचे दिसून आले.
मिशिगन विद्यापीठात डॉक्टरेट करणाऱ्या या संशोधनाच्या प्रमुख अभ्यासक इरिका जॅनसेन यांच्या मते, हा फरक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पुढील आयुष्याशी संबंधित असलेल्या आजारांशी त्यांचा संबंध जोडलेला आहे. तसेच तारुण्यात घेतलेल्या आहारातील काही घटकदेखील महत्त्वपूर्ण आहेत. कारण आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाल रंगाचे मांस सेवन केल्याने कालांतराने स्तनाच्या कर्करोगाबरोबरच हृद्रोग, लठ्ठपणा आणि दुसऱ्या प्रकारचा मधुमेह बळावण्याची शक्यताही असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)