वाइनमध्ये आढळणारे रेस्हेराट्रोल हे संयुग स्नायूंचे वस्तुमान टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आगामी मंगळ मोहिमेतही अंतराळवीरांच्या स्नायूंचे वस्तुमान टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबत हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उंदरांवर संशोधन केले आहे. ‘नासा’च्या आर्थिक साह्याने झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘फ्रन्टियर्स इन फिजिओलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. मंगळाप्रमाणेच गुरुत्वीय वातावरण असलेल्या स्थितीतही रेस्हेराट्रोलमुळे उंदरांच्या स्नायूंचे वस्तूमान तसेच बळकटी टिकवून बऱ्याच प्रमाणात ठेवणे शक्य झाल्याचे या अभ्यासात दिसून आले.

यासंदर्भात अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूलचे मारी मॉरट्रेयूक्स म्हणाले की, पृथ्वीच्या तुलनेत केवळ ४० टक्के गुरुत्वबल असलेल्या मंगळावरील मोहिमांत अंतराळवीर सुरक्षित ठेवायचे असतील, तर तेथील वातावरणात त्यांच्या स्नायूंमध्ये होणारे बदल थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये आहारविषयक उपाययोजना या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण अंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीरांसाठी ज्याप्रमाणे व्यायामासाठी साधने ठेवली आहेत, तशी व्यवस्था मंगळावर नसणार आहे, असे त्यांनी सांगितले. अशा वेळी रेस्हेराट्रोल हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे संयुग द्राक्ष आणि ब्लॅकबेरीच्या फळाच्या सालीमध्ये असते. ते वेदनाशामक, अ‍ॅन्टिऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते. मधुमेह रोखण्यासाठीही हे संयुग उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मॉरट्रेयूक्स यांनी सांगितले की, अंतराळ मोहिमेसारख्या वातावरणात रेस्हेराट्रोलमुळे उंदरांच्या शरीरातील स्नायू आणि हाडांचे वस्तुमान टिकवून ठेवणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या संयुगाची छोटी मात्रा मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांनी रोज घेतल्यास, त्यांनाही लाभ होईल असे आम्हाला वाटते.