‘शाओमी’ने आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi 9 Power भारतात लाँच केला आहे. Redmi 9 Power मध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असून फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. रेडमीच्या या नव्या स्मार्टफोनची सॅमसंग गॅलेक्सी M11, व्हिवो Y20 आणि Oppo A53 यांसारख्या स्मार्टफोनसोबत टक्कर असेल. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. फोनमधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवण्याचा पर्यायही आहे.

Redmi 9 Power किंमत :-
Redmi 9 Power च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेअरी रेड आणि माइटी ब्लॅक अशा चार रंगांमध्ये खरेदी करता येईल. अ‍ॅमझॉन आणि Mi.com या संकेतस्थळावर 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून हा फोन सेलमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय मी होम्स, मी स्टुडिओज आणि मी स्टोअर्समध्येही हा फोन उपलब्ध असेल.

Redmi 9 Power स्पेसिफिकेशन्स :-
या हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, अ‍ॅड्रेनो 610 जीपीयू असून अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 12 वर हा फोन कार्यरत आहे. फोनमध्ये 6.53 इंचाची फुल एचडी+ डॉट ड्रॉप स्क्रीन असून प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा सपोर्ट आहे. ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट फोनला देण्यात आला आहे. रेडमी 9 पॉवरमध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कॅमेऱ्याच्या सेन्सरला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) फेस अनलॉक सपोर्टही मिळेल. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी Redmi 9 Power मध्ये 4जी व्हीओएलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लुटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड ब्लास्टर, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर्स, फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. या फोनमध्ये कंपनीने 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.