स्वस्तात मस्त स्मार्टफोन बनविण्यासाठी ओळखली जाणारी शाओमी कंपनी आज तब्बल 4.8 लाख रुपये किंमतीचा एक स्पेशल स्मार्टफोन लाँच करणार आहे. नेहमी परवडणाऱ्या किंमतीचे स्मार्टफोन बनविणारी शाओमी इतका महागडा स्मार्टफोन लाँच करत असल्यामुळे या फोनबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच शाओमी इंडियाचे मॅनेजिंग एडिटर मनू जैन यांनी ट्विटरद्वारे हा OUT OF THE WORLD अर्थात जगावेगळा फोन असेल, श्वास रोखून धरा असं ट्विट केल्यामुळे अधिक चर्चा आहे.

शाओमी कंपनी आज भारतात के सीरिजमधील पहिले दोन स्मार्टफोन रेडमी के20 आणि रेडमी के20 प्रो लाँच करणार आहे. या दोन्ही फोनसोबत कंपनी एक स्पेशल व्हेरिअंट असलेला स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. शाओमी इंडियाचे मॅनेजिंग एडिटर मनू जैन यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिलीये. मनू जैन यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटोही पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये आकर्षक गोल्ड फिनिशचा आणि मागील बाजूला K लोगो असलेला एक फोन दिसत आहे. मागील बाजूला K लोगो असल्याने हा स्पेशल व्हेरिअंट असलेला रेडमी के20 प्रो फोन असण्याची चर्चा आहे. हा स्मार्टफोन जगावेगळा असेल असं ट्विट मनू जैन यांनी केलं आहे. तसंच या फोनची किंमत 4.8 लाख रुपये असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हा फोन नेमका कसा असणार, यात काय फीचर्स आहेत याबाबत सस्पेंस कंपनीने कायम ठेवला आहे.

Redmi K20 – K20 Pro आज होणार लाँच, चिनमध्ये मिळालाय भरघोस प्रतिसाद –
Xiaomi ची सब ब्रँड कंपनी Redmi ने दोन महिन्यांपूर्वी Redmi K20 Pro हा स्मार्टफोन चिनमध्ये लाँच केला होता. यानंतर कंपनी आता हा स्मार्टफोन भारतातही लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच कंपनी Redmi K20 हा स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. अर्थात कंपनीचे K20, K20 Pro हे दोन स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहेत.

लाँचिंगनंतर Redmi K20 आणि K20 Pro हे दोन्ही स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. Redmi K20 मध्ये स्नॅपड्रॅगन 710 आणि Redmi K20 Pro मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोसाठी तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.

चिनमध्ये भरघोस प्रतिसाद –
चिनमध्ये लाँचिंगनंतर K20 Pro या स्मार्टफोनसाठी पहिला सेल आयोजित करण्यात आला होता, यावेळी ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 10 वाजेपासून सेल सुरू झाला होता आणि साडे अकरा वाजेपर्यंत अर्थात अवघ्या दीड तासांमध्ये स्टॉक संपला. चीनमधील ‘वीबो’ या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या एका पोस्टरनुसार पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनच्या 2 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली होती.

चिनमधील किंमत –
चिनमध्ये Redmi K20 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 20 हजार रुपये आहे. तर Redmi K20 Pro च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2499 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 25 हजार रुपये आहे. याशिवाय 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 28 हजार रुपये आणि 30 हजार रुपये आहे. भारतात या फोनची किंमत किती असेल हे अद्याप समोर आलेलं नाही, मात्र याच्याच जवळपास किंमत असण्याची शक्यता आहे.