Redmi Note 6 Pro च्या 6 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत पहिल्यांदाच कमी झाली आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांची कपात केली आहे. शाओमीचं अधिकृत संकेतस्थळ (Mi.com) आणि फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करता येणार आहे.

कंपनीकडून दोन हजार रुपयांची कपात करण्यात आल्याने 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत आता 13 हजार 999 रुपये झाली आहे. आधी ही किंमत 15 हजार 999 रुपये होती. या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटच्या किंमतीत यापूर्वीच दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली होती.

Redmi Note 6 Pro हा फोन दिसायला जवळपास Note 5 Pro प्रमाणेच आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. म्हणजे एकूण चार कॅमेरे यात आहेत. सेल्फीसाठी असलेल्या दोन कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. मागील बाजूला 12 आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये रेडमी नोट 5 प्रो प्रमाणेच 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 6 प्रो MIUI 10 वर आधारित अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल. यामध्ये 6.26 इंच आयपीएस एलसीडी फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे.