वजन कमी केल्याने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता एक तृतीयांशाने कमी होते असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

जास्त वजनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, कारण मेद पेशी या स्तनाच्या कर्करोगास कारण ठरणारी संप्रेरके निर्माण करीत असतात, पण आहारात बदल करून स्तनाच्या कर्करोगाची जोखीम टाळता येते किंवा नाही याबाबत अजून स्पष्टीकरण झालेले नाही.

गेल्या अकरा वर्षांत ५० ते ७९ वयोगटातील ६१ हजार महिलांची माहिती घेऊन हे संशोधन करण्यात आले आहे.

मध्यम प्रमाणातच वजन करणे हे स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यास उपयुक्त ठरते. अमेरिकेतील सिटी ऑफ होप येथील डिपार्टमेंट ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी या संस्थेचे प्रमुख संशोधक रोवान चेलबोवस्की यांनी सांगितले की, वजन कमी करण्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, विशेषकरून रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये हे शक्य असते. ज्या महिला वजन पाच टक्के कमी करतात त्यांचा कर्करोगाचा धोका १२ टक्क्य़ांनी कमी होतो.

रजोनिवृत्तीनंतर वजन १५ टक्के कमी केले, तर कर्करोगाची जोखीम ३७ टक्क्य़ांनी कमी होते.