वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

लठ्ठपणामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. वजन घटविण्यासंदर्भातील अभ्यासात वजन घटविण्याची शस्त्रक्रिया कर्करोगाचा धोका कमी करत असल्याचे म्हटले आहे. लठ्ठपणा, वजन घटविणे आणि घातक मॅलिग्नंट मेलानोमा (कर्करोगाची प्राथमिक अवस्था) यांचा अभ्यास केल्यानंतर हे संशोधन मांडण्यात आले आहे. स्विडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी स्विडनमधील वजन घटविण्याची शस्त्रक्रिया केलेल्यांच्या प्रकरणांचा अभ्यास केला. वजन घटविण्याची शस्त्रक्रिया केलेल्या २००७ मधील रुग्णांचे वय, लिंग, कर्करोगाच्या धोक्याची पातळी, वजन आणि उपचार या संदर्भाची नोंद घेतली. धोक्याची पातळी आणि शस्त्रक्रिया यांचा अभ्यास करण्यात आला.

वजन घटविण्याची शस्त्रक्रिया केल्याने कर्करोगाचा धोका कमी होत असल्याचे संशोधकांना आढळले. १८ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतल्यानंतर शस्त्रक्रियेमुळे कर्करोगाच्या प्राथमिक पातळीचा (मॅलिग्नंट मेलानोमा) धोका ६१ टक्क्यांनी तर त्वचेच्या कर्करोगाचा धोका ४२ टक्क्यांनी कमी होत असल्याचे स्पष्ट झाले. वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्वचेच्या कर्करोगाला पूरक पेशी नष्ट होतात, असे संशोधकांनी सांगितले.