मधुमेही व्यक्तींना नेहमी इन्शुलीनची इंजेक्शने घ्यावी लागतात, हा काहींसाठी वेदनादायी पर्याय आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून इन्शुलीनच्या गोळ्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी इंजेक्शनची कटकट राहणार नाही. नवीन गोळ्या या व्हेसिकलच्या रूपात असतील असे संशोधकांचे म्हणणे आहे. यात कोलेस्टोसोम्स तंत्रज्ञान वापरले आहे. कोलेस्टोसोम हे उदासीन कणांचे उदाहरण मानले जाते; ते लिपिड म्हणजे मेद स्वरूपातील आहे. त्याच्या मदतीने काही गोष्टी साध्य करता येतात असे नायगारा विद्यापीठाच्या मेरी मॅककोर्ट यांनी सांगितले. इन्शुलीन तोंडावाटे देताना ते पोटात सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी लागते. इन्शुलीनसारखी प्रथिने पोटातील आम्लतेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे ती आतडय़ात पोहोचण्यापूर्वीच विघटन पावतात व रक्तात पोहोचत नाहीत. कोलेस्टोसोम्स तंत्राने मॅककोर्ट, लॉकेन्स मिलनिकी व जामी कॅटलनो यांनी इन्शुलीनला गोळीच्या आवरणात आणले आहे. व्हेसिकलच्या रूपात लिपिड रेणू असतात. ते मेदाशी बंध जोडतात, पण संशोधकांच्या मते लिपोसोम्स हे औषध वाहून नेऊ शकतात. अनेक लिपोसोम हे पॉलिमर कोटिंगमध्ये ठेवावे लागतात. संगणकीय नमुन्यानुसार लिपीडस विशिष्ट रासायनिक रेणू रचनेला चिकटले तर ते उदासीन बनतात, त्यावर पोटातील आम्लाचा परिणाम होत नाही. कोलेस्टोसोम्स पोटात पोहोचतात तेव्हा काहीतरी शोषण्याचे औषध आले आहे याची शरीराला जाणीव होते. व्हेसिकल्स आतडय़ातून रक्तप्रवाहात जातात व तेथे फुटतात, त्यातून इन्शुलीन बाहेर पडते. जेथे इन्शुलीन हवे असेल तेथे कोलेस्टोसोम जातात. त्यांची उपलब्धता पुरेशी आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)