रिलायन्स बिग टीव्हीने भारतातील ग्राहकांसाठी एक खूशखबर आणली आहे. एचडी गुणवत्तेच्या मनोरंजन चॅनल्सची व्याप्ती वाढविण्यासाठी नवी ऑफर आणली आहे. यामध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना २, ४ महिने नाही तर तब्बल १ वर्षासाठी सर्व चॅनेल मोफत देणार आहे. यातही जे चॅनल मोफत असतात ते पुढे ५ वर्षासाठी ग्राहकांना मोफत वापरता येतील, मात्र उर्वरित चॅनलचे १ वर्षानंतर पैसे भरावे लागतील. याबरोबरच कंपनीने एचईवीसी सेट टॉप बॉक्स मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. याची बुकिंग १ मार्च पासून सुरु करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. बुकींग करताना ग्राहकांना ५०० रुपये भरावे लागणार आहेत. तर त्यानंतर जोडणीसाठी १५०० रुपये भरावे लागतील.

याशिवाय पुढे २ वर्ष सलग ग्राहकांना ही सुविधा सुरु ठेवण्यासाठी दरमहा ३०० रुपये भरावे लागतील. त्यानंतर ग्राहकांना २००० रुपये कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक रिचार्जच्या स्वरुपात मिळेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मनोरंन सुविधा खिशाला परवडेल अशी व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. भारतीयांचा टीव्हीमधून मनोरंजन करुन घेण्याची मार्ग बदलला असून, रिलायन्स बिग टीव्ही यासाठी एक नवी सुरूवात करत असल्याचे रिलायन्स बिग टीव्हीचे निर्देशक विजेंद्र सिंह यांनी सांगितले. यामध्ये ग्राहकांना यूएसबी पोर्ट, यूट्युब आणि टीव्ही शोचे रेकॉर्डिंग अशी आकर्षक फिचर्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे कमीत कमी किंमतीत ग्राहकांना रिलायन्सकडून आकर्षक सुविधा मिळत आहेत.