Reliance Industries Annual General Meeting 2020 : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा यावर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आघाडीची टेक कंपनी गुगल मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. तसेच, गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु, असेही अंबानी यावेळी म्हणाले.

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्यांची हिस्सेदारी घेईल. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन महिन्यांत झालेल्या एकूण गुंतवणूकीचा आकडा 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपये होईल.

आणखी वाचा- Made in India: जिओ पुढील वर्षी लाँच करणार 5G नेटवर्क

या कराराबाबत बोलताना, “गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु” असे मुकेश अंबानी म्हणाले. तर, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहोचायला हवं, जिओसोबत भागीदारी केल्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचता येईल याचा आनंद वाटतोय” अशी प्रतिक्रिया पिचाई यांनी दिली आहे.

आणखी वाचा- नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जिओची वाटचाल – मुकेश अंबानी


यासोबतच, संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाॅंच करणार असल्याचंही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितलं.  5G चे परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाॅंच करण्यास जिओ सज्ज असल्याचे अंबानी म्हणाले. इतकंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचंही ते म्हणाले.

आणखी वाचा- रिलायन्सने लाँच केली Jio Glass ची सेवा; डिजीटल शिक्षणासाठी होणार फायदा

याशिवाय काही दिवसांपूर्वीच सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे.