करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने देशातील टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी आधी आपल्या प्रीपेड पॅकची व्हॅलिडिटी वाढवली, ग्राहकांना 10 रुपये मोफत टॉकटाइम दिला. याशिवाय वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी नवीन रिचार्ज पॅकही आणले. जिओने एकीकडे ‘वर्क फ्रॉम होम’ पॅक लॉन्च केला, तर व्होडाफोनने ‘डबल डेटा’ ऑफर आणली. आता, पुन्हा एकदा जिओ आणि व्होडाफोनने आपआपल्या ग्राहकांसाठी दररोज 2 जीबी डेटा मोफत देण्याची ऑफर आणली आहे.

व्होडाफोनची ऑफर –
व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी दररोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ही ऑफर कंपनीकडून ग्राहकांना दिली जात आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या ऑफरची वैधता सात दिवस आहे. म्हणजे सात दिवसांपर्यंत ग्राहकांना दररोज मोफत 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. एकूण 14 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळेल. ही ऑफर पूर्णतः मोफत असेल. पण, त्यासाठी तुमच्याकडे व्होडाफोन-आयडियाचा कोणताही अॅक्टिव्ह प्लॅन असणे आवश्यक आहे. मात्र, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जात आहे. व्होडाफोनच्या या ऑफरबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 121363 डायल करु शकता. जर, तुम्हाला ही ऑफर लागू होत असेल तर त्याबाबत तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. त्यामध्ये लॉकडाउनमुळे हे स्पेशल गिफ्ट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जर, ऑफर लागू होणार नसेल तर व्हॉइस मेसेजद्वारे तसं सांगितलं जाईल.

जिओची ऑफर –
रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात ‘Jio Data Pack’ हा दररोज 2GB डेटा बेनिफिटचा प्लॅन आणला होता. या प्लॅनमधील फायदे मार्च महिन्याच्या अखेरिस युजर्सच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आले होते. ‘टेलिकॉम टॉक’च्या वृत्तानुसार, आता कंपनीने पुन्हा एकदा असाच प्लॅन आणला असून युजर्सना चार दिवसांच्या वैधतेसह दररोज 2जीबी एक्स्ट्रा डेटा फ्रीमध्ये दिला जात आहे. ‘Jio Data Pack’ अंतर्गत कंपनी ग्राहकांना दररोज 2GB एक्स्ट्रा डेटा देत आहे. 27 एप्रिलपासून कंपनीकडून एक्स्ट्रा डेटा ग्राहकांच्या अकाउंटध्ये क्रेडिट करण्यास सुरूवात झाली आहे. अकाउंटमध्ये एक्स्ट्रा डेटा क्रेडिट झाल्यानंतर याची वैधता चार दिवस असेल. या ऑफरमुळे ग्राहकांना दररोज मोफत 2GB एक्स्ट्रा डेटा वापरायला मिळतोय. म्हणजे जर तुमच्या नंबरवर दररोज 1.5जीबी डेटामर्यादा असलेला 599 रुपयांचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असेल तर या ऑफरनुसार तुम्हाला एकूण 3.5जीबी डेटा मिळेल. मात्र, कंपनीची ही ऑफर मर्यादित ग्राहकांसाठी आहे. या ऑफरसाठी ग्राहकांची ‘रँडम’ निवड केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेलच हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, युजर्स My Jio अ‍ॅपमध्ये जाऊन जिओ डेटा पॅकच्या उपलब्धता चेक करु शकता.