रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज जिओ ग्लास सेवेची घोषणा करण्यात आली. जिओ ग्लास ही थ्रीडी इंटरॅक्शन सेवा असणार असून यामध्ये संवाद साधणाऱ्या व्यक्तीची हॉलोग्राम प्रतिकृती पाहता येणार आहे. प्रमुख्याने डिजीटल शिक्षणाचे ध्येय समोर ठेऊन जिओ ग्लास लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.

रिलायन्सच्या किरण थॉमस यांनी जीओ ग्लासची घोषणा केली. “जिओ ग्लासमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना व्ह्यर्चूअल थ्रीडी क्लास रुमच्या माध्यमातून संवाद साधता येईल. या माध्यमातून हॉलोग्राफीक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण घेता येईल. यासाठी जिओने रिअ‍ॅलिटी क्लाउडचे तंत्रज्ञान वापरुन रियल टाइम टेलिकास्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. जिओ ग्लासेसमुळे पुस्तकातून भूगोल शिकणं इतिहास जमा होणार असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव हॉलोग्रामच्या माध्यमातून घेता येईल,” असं थॉमस म्हणाले.

नक्की पाहा >> Jio Glass : जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि कधीपासून होणार उपलब्ध

थ्रीडी तंत्रज्ञान सर्वसामान्यांना वापरता येण्याच्या दृष्टीने जीओ ग्लासची सेवा बाजारात आणण्यात आली आहे. सध्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमध्ये हॉलोग्राम संवादाची म्हणजेच समोर संवाद साधणाऱ्या व्यक्तीची डिजीटल प्रतिमा पाहता येणार असून संवाद अधिक खराखुरा वाटण्यास मदत होणार आहे.

जिओ ग्लास अ‍ॅव्हिएटर्सचे वजन हे ७५ ग्राम असणार आहे. यामध्ये पर्सनलाइज ऑडिओची सुविधा देण्यात आली आहे. जिओ ग्लास हे वायरच्या माध्यमातून मोबाइलशी कनेक्ट करुन डेटा ड्रान्सफर करता येणार आहे. या ट्रान्सफरच्या सोयीमुळे वेगवेगळ्या कारणांसाठी जिओ ग्लास वापरता येईल असं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या जिओ ग्लास हे २५ अ‍ॅप्लिकेशनला सपोर्ट करते असंही कंपनीने सांगितलं आहे.

नक्की वाचा >> नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जिओची वाटचाल – मुकेश अंबानी

पूर्णपणे भारतीय फाइव्ह जी नेटवर्क

जिओने पूर्णपणे भारतीय फाइव्हजी नेटवर्क तंत्रज्ञान तयार केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. जिओचं तंत्रज्ञान शून्यापासून निर्माण केलं असून १०० टक्के भारतीय आहे. संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं हे फाइव्ह जी नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाॅंच करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. फाइव्ह जीचे स्पेक्ट्रमचं वाटप करण्यास सुरुवात झाल्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये हे तंत्रज्ञान देशामध्ये लाँच करण्यासाठी जिओ पूर्णपणे सज्ज आहे असं अंबानींनी सांगितलं.