टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करत जिओने स्पर्धक कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यास सुरुवात केली. एकामागे एक आकर्षक ऑफर्स लाँच करत कंपनीने आपल्या ग्राहकांना खूश केले. जिओच्या आकर्षक दरांमुळे इतर नामांकित कंपन्यांनीही आपल्या दरांमध्ये बदल केले. मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंगची सुविधा देत जिओने एकप्रकारे मोबाईल क्षेत्रात मोठी क्रांतीच केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जिओने आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का देण्याचे ठरवले आहे. यासाठी एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

जिओने ‘दिवाळी धन-धना-धन ऑफर’ आणली आहे. यामध्ये ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच एका अर्थाने हा प्लॅन ग्राहकांना मोफतच मिळणार आहे. ग्राहकांना ५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील, हे व्हाऊचर My Jio अॅपमध्ये उपलब्ध असतील. या व्हाऊचर्सचा फायदा भविष्यात ३०९ रूपये किंवा ९१ रूपये आणि त्यापेक्षा जास्तीचा डेटा रिचार्ज करताना घेता येणार आहे. मात्र ग्राहकांना १५ नोव्हेंबरनंतरच या व्हाऊचर्सचा वापर करता येणार आहे.

रिलायन्सच्या याआधीच्या धन धना धन ऑफरवर एअरटेल कंपनीने हरकत घेत ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’कडे (ट्राय) धाव घेतली होती. याशिवाय नुकतेच जिओनेही आपल्या कार्डचा वापर मोफत कॉलिंगसाठी करण्यात येऊ नये यासाठी कॉलच्या संख्येवर मर्यादा घातली होती. मात्र ही नवी ऑफर म्हणजे ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट ठरणार आहे.