दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीडमध्ये अव्वल ठरलीये. तर, अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने बाजी मारली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे.

ट्रायच्या नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार, डाउनलोड स्पीडच्या बाबतीत सरासरी २०.८ एमबीपीएस स्पीडसह जिओने बाजी मारली आहे. ऑक्टोबर महिन्यातील डाउनलोड स्पीडच्या तुलनेत जिओचा स्पीड ३.० एमबीपीएस जास्त नोंदवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात जिओचा 4जी स्पीड १७.८ एमबीपीएस होता. तर, नोव्हेंबरमध्ये भारती एअरटेलच्या कामगिरीमध्ये थोडीफार सुधारणा झाली. एअरटेलचा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड ऑक्टोबरच्या 7.5 एमबीपीएसच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 8 एमबीपीएस राहिला. दुसरीकडे, व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर या दोन्ही कंपन्या व्होडाफोन-आयडिया म्हणून एकत्र आल्या असल्या तरी ट्राय मात्र दोन्ही कंपन्यांचे आकडे वेगवेगळे दाखवते. त्यानुसार, व्होडाफोनचा डाउनलोड स्पीड 9.8 एमबीपीएस आणि आयडियाचा स्पीड 8.8 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला.

अपलोड स्पीड :-
अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने बाजी मारली आहे. सरासरी 6.5 एमबीपीएस अपलोड स्पीडसह व्होडाफोन पहिल्या क्रमांकावर, तर 5.8 एमबीपीएस अपलोड स्पीडसह आयडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, एअरटेल आण रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्यांचा सरासरी अपलोड स्पीड अनुक्रमे 3.7 आणि 4 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला आहे. ट्रायकडून ‘मायस्पीड अ‍ॅप्लिकेशन’च्या मदतीने सरासरी स्पीड मोजला जातो.