रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोबाइल ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव करत जिओ ४ जी सेवा बाजारात आणली. जिओ ४ जीमुळे एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसारख्या प्रस्थापित कंपन्यांचे धाबे दणाणले. सातत्याने दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे या कंपन्यांना कोट्यावधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यानंतर कंपनीने आपला स्वस्तातील मोबाईल लाँच करत मोबाईल मार्केटमध्येही दाणादाण उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा रिलायन्स जिओ आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. ब्रॉडबँड सेवा आणत कंपनी पुन्हा एकदा इंटरनेटच्या बाजारात धुमाकूळ घालणार आहे. या प्लॅनबाबत मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती मात्र अखेर त्याच्या लाँचिंगची तारीख जाहीर होणार आहे.

५ जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका मिटींगमध्ये याबाबतचा खुलासा होईल असं कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कदाचित या दिवशी हा ब्रॉडबँड लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेगवान इंटरनेट सेवा ही आज सर्वांचीच मुलभुत गरज आहे. आणि हीच गरज हेरुन जिओने आता ब्रॉडबॅण्ड इंटरनेट क्षेत्रातही येण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या अशा कॉम्बो ऑफर देणार आहे. याचा स्पीड १०० mbps असेल असेही सांगितले जात आहे. तसेच यामध्ये ग्राहकांना मोफत डेटाही देण्यात येईल. या प्लॅनची किंमत १,००० ते १,५०० रुपये असण्याची शक्यता आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हिडियो आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात येईल.

हा प्लॅन कंपनीच्या मोबाईल प्लॅनप्रमाणेच असेल असे सांगण्यात आले आहे. या प्लॅनसाठी रिलायन्स जिओ मागच्या काही दिवसांपासून ठराविक शहरांत पायलट प्रोजेक्टवर काम करत आहे. सध्या एअरटेल कंपनी सर्वात स्वस्त ब्रॉडबॅण्ड सेवा देत आहे. दिल्लीत त्यांचे १०९९ रु. ते १२९९ रु. दरम्यान ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध आहे. यात ते १०० MBPSच्या वेगाने प्रती महिना २५० GB डेटा देतात. शिवाय त्यात आता आणखीन १००० GB 4G डेटा वाढवण्यात आला आहे. जर रिलायन्स जिओने १००० रुपयांच्या आत ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध केली तर या क्षेत्रात असलेल्या इतर कंपन्यांना पुन्हा एकदा कोट्यावधींचे नुकसान होणार आहे.