गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या टॅरिफ दरवाढीचा जबरदस्त फटका टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओला बसला आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक घटले. 2016 मध्ये लाँच झाल्यापासून दर महिन्याला किमान पाच दशलक्ष ग्राहक जोडणाऱ्या जिओकडे डिसेंबर 2019 मध्ये केवळ 82 हजार 308 नवीन ग्राहक आले. बीएसएनएलला टॅरिफ दरवाढीचा जबरदस्त फायदा झाला आणि त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 4.2 लाख नवीन ग्राहक जोडले. त्यामुळे, आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने 49 आणि 69 रुपयांचे दोन नवे स्वस्त प्लॅन आणले आहेत. पण कंपनीने आणलेले हे प्लॅन्स केवळ Jio phone ग्राहकांसाठी आहेत. जाणून घेऊया दोन्ही प्लॅन्सबाबत :-

49 रुपयांचा प्लॅन :-
कंपनीकडून 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता दिली जात आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये 14 दिवसांसाठी 2 जीबी इंटरनेट डेटा युजर्सना वापरण्यास मिळेल. तसेच, जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही घेता येईल. तर, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी
या प्लॅनमध्ये 250 मिनिटं मिळतात. शिवाय 14 दिवसांच्या वैधतेसह युजर्सना 25 एसएमएस मिळतात आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शनही मिळेल.

69 रुपयांचा प्लॅन :-
49 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे 69 रुपयांच्या प्लॅनमध्येही 14 दिवसांची वैधता मिळेल. दोन्ही प्लॅनमध्ये मोठा फरक डेटाच्या बाबतीत आहे. 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 14 दिवसांच्या वैधतेसह एकूण 7 जीबी डेटा मिळतो. पण, दररोज केवळ 500MB डेटाचा वापर युजर करु शकतात. त्यानंतर डेटा स्पीड 64kbps इतका कमी होतो. अन्य फायदे 49 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत.