रिलायन्स जिओने वर्षापूर्वी कमी किंमतीत इंटरनेट सुविधा देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी फिचरफोन दाखल करत मोबाईल क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे जिओने मोबाईल क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतकेच काय जिओच्या या स्वस्तातील सुविधांमुळे स्पर्धक कंपन्यांचेही धाबे दणाणले असून त्यांनीही आपल्या वेगवेगळ्या सेवांच्या दरांत कपात केली आहे. आता मोबाईलच्या क्षेत्रानंतर जिओने आपली नवनवीन उत्पादने बाजारात दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच जिओने JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च केले आहे. त्यानंतर जिओने लो कॉस्ट ब्रॉड ब्रॅंड नेटवर्क जिओ फायबरही बाजारात आणले. आता जिओ सिम कार्ड असलेला लॅपटॉप बाजारात दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

यासंदर्भात मुकेश अंबानींची मालकी असलेल्या रिलायन्स जिओचे क्वालकॉम कंपनीशी बोलणे सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. क्वालकॉम विंडोज १० वर काम करत असल्याने या कंपनीची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. क्वालकॉम जिओ आणि रिलायन्ससाठी ४ जी फिचरफोनसाठीही काम करत होती. आता नव्याने येणाऱ्या लॅपटॉपमध्ये मोबाईल कनेक्शन असेल. जिओशिवायही क्वालकॉम लॅपटॉप तयार करणाऱ्या इतर कंपन्यांसोबत काम करत आहे, यामध्ये एचपी, आसूस आणि लिनोव्हो या कंपन्यांचा समावेश आहे. याबरोबरच येत्या काळात आणखी काही कंपन्यांबरोबर क्वालकॉम जोडले जाण्याची शक्यता आहे. या लॅटॉपची किंमत सामान्यांना परवडेल इतकी असणार आहे.