रिलायंस जिओ सातत्याने आपल्या जिओफोनच्या ग्राहकांसाठी नवनवी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. आता जिओफोनचे ग्राहक IRCTC च्या रेल्वे तिकीट बुकिंग सेवेचाही लाभ घेऊ शकणार आहेत. कंपनीने JioPhone आणि JioPhone 2 युजर्ससाठी एक नवं अॅप JioRail लाँच केलं आहे.

या अॅपद्वारे युजर्स रेल्वेचं तिकीट बुक करण्यापासून तिकीट रद्द करणं असो किंवा तत्काळ आणि पीएनआर स्टेटस चेक करणं असो सर्व गोष्टी केवळ एका क्लिकवर तपासू शकतील. रिलायंस जिओ कंपनी ही भारतीय रेल्वची अधिकृत सेवा पुरवठादार कंपनी आहे. याच भागीदारीचं पुढचं पाऊल म्हणनू कंपनीने JioRail अॅप लाँच केलं आहे.

जिओफोन वापरणाऱ्या ज्या ग्राहकांकडे IRCTC चं अकाउंट नसेल ते JioRail अॅपद्वारे नवं अकाउंट बनवू शकतात. तिकीट बुक करण्यासाठी ग्राहक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ई-वॉलेटचा वापर करु शकतात. याशिवाय PNR स्टेटस, गाड्यांची वेळ, गाड्यांचा मार्ग आणि उपलब्ध आसन या सर्वांबाबत JioRail अॅपवर माहिती मिळू शकते.