रिलायन्स जिओने वर्षापूर्वी कमी किंमतीत इंटरनेट सुविधा देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी फिचरफोन दाखल करत मोबाईल क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे जिओने मोबाईल क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतकेच काय जिओच्या या स्वस्तातील सुविधांमुळे स्पर्धक कंपन्यांचेही धाबे दणाणले असून त्यांनीही आपल्या वेगवेगळ्या सेवांच्या दरांत कपात केली आहे. नुकतीच जिओने आपली आणखी एक आकर्षक ऑफर जाहीर केली असून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यचा प्रयत्न कंपनी करत आहे.

जिओने आपल्या युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून हंगामा ऑफर असे नावही देण्यात आले आहे. यामध्ये ६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटा मिळणार आहे. जिओकडून मागच्या काही दिवसांत इंटरनेटच्या विशेष ऑफर्स देण्यात आल्यानंतर आता ही आणखी एक खास ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये डेटा आणि कॉलिंगसोबतच अनलिमिटेड मेसेजची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी असल्याचे बोलले जात आहे.

याशिवायही जिओने आणखी दोन प्लॅन जाहीर केले आहेत. ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच दररोज १०० एसएमएस आणि रोज ५०० एमबी ४ जी डेटा मिळणार आहे. जियो फोन आणि जियो फोन २ च्या युजर्ससाठी असणाऱ्या या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. म्हणजेच युजर्सना एकूण १४ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच कंपनीने १५३ रुपयांचाही एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी ४ जी डेटा मिळणार असून त्याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. म्हणजेच युजर्सना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि रोज १०० मेसेजही मिळतील.

अशा आकर्षक प्लॅनबरोबरच आता जिओने आपली नवनवीन उत्पादने बाजारात दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच जिओने JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च केले आहे. त्यानंतर जिओने लो कॉस्ट ब्रॉड ब्रॅंड नेटवर्क जिओ फायबरही बाजारात आणले. आता जिओ सिम कार्ड असलेला लॅपटॉप बाजारात दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच जिओचा फिचर फोन २ बाजारात १५ ऑगस्टपासून बाजारात दाखल होणार आहे.