रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना गुड न्यूज देताना आता विमान प्रवासातही कॉलिंग व डेटा सुविधा देण्याची घोषणा केली आहे. यासाठी जिओने एअरोमोबाइलसोबत भागीदारी केली आहे. एअरोमोबाइल ही पॅनासॉनिक एवियोनिक्स कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे. या भागीदारीअंतर्गत जिओचे ग्राहक विमान प्रवासातही कंपनीच्या सर्व सेवांची मजा घेऊ शकतात.

रिलायन्स जिओची ही सेवा व्हर्जिन अटलांटिक, एतिहाद एअरवेज, लुफ्तान्सा, मलिंडो एअर, स्विस इंटरनेशनल एअरलाइन्स, अमिरात एअरलाइन्स, बिमान बांगलादेश एअरलाइन्स अशा 22 आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर उपलब्ध असेल. अशाप्रकारे विमान प्रवासात मोबाइल सेवा देणारी जिओ देशातील पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. विमान 20 हजार फूट उंचीवर गेल्यानंतर प्रवाशांना जिओची ही सेवा वापरता येईल. परदेशात जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाला परवडणाऱ्या किंमतीत विमान प्रवासातही व्हॉइस आणि डेटा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जिओकडून या भागीदारीबाबत माहिती देताना सांगण्यात आले.

तीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक केले लाँच :-
या सेवेच्या घोषणेसोबतच जिओने तीन नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनची घोषणा केली आहे. अनुक्रमे 499 रुपये, 699 रुपये आणि 999 रुपये किंमतीचे हे तीन प्लॅन आहेत. पण या तिन्ही प्लॅनची वैधता केवळ एक दिवसाची असणार आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला 100 मिनिटे कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. याशिवाय 499 रुपयांच्या पॅकमध्ये 250 एमबी, 699 रुपयांच्या पॅकमध्ये 500 एमबी आणि 999 रुपयांच्या पॅकमध्ये 1 जीबी डेटा मिळेल.