रिलायन्स जिओ मागच्या काही काळापासून बाजारात इतर स्पर्धक कंपन्यांना चांगलीच टक्कर देत आहे. मोफत इंटरनेटनंतर कंपनीने आपला फोन बाजारात आणला. त्यालाही ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. कंपनीने मागील आठवड्यात आपल्या या फोनचा फ्लॅश सेल जाहीर केला होता, तेव्हा ऑनलाइन विक्रीसाठी असलेला हा फोन अवघ्या एका मिनीटात आऊट ऑफ स्टॉक झाला. त्यामुळे ग्राहकांची या फोनलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तर कंपनीने आपल्या या नवीन मॉडेलच्या विक्रीसाठी पुढील फ्लॅश सेल ३० ऑगस्ट रोजी जाहीर केला आहे. त्यामुळे ज्यांना हा फोन खरेदी करायचा आहे ते ग्राहक दुपारी १२ वाजल्यापासून jio.com या कंपनीच्या वेबसाईटवर फोनची ऑनलाइन खरेदी करु शकतात. यु ट्यूब, गुगल मॅप्स आणि फेसबुकचे इनबिल्ट अॅप ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून या फोनची किंमत २,९९९ रुपये आहे. लवकरच आपण या फोनमध्ये व्हॉट्स अॅपची सुविधाही देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

या फोनची फिचर्सही आकर्षक असल्याने त्याला ग्राहकांची पसंती मिळताना दिसत आहे. फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच मेमरी कार्डद्वारे हे स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. या ४जी फोनमध्ये २ हजार मिलिअॅम्पियर्सची बॅटरी आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.