रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी एक मोठा धमाका केला जाण्याची शक्यता आहे. ५ हजार रुपये किंमत असलेला 5जी स्मार्ट फोन आता अडीच ते तीन हजार रुपयांमध्येच ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती, कंपनीच्या एका अधिकाऱ्याकडून समोर आली आहे.

रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंपीनेच लक्ष 2जी चा वापर करणाऱ्या २० ते ३० कोटी युजर्सवर आहे. सुरुवातीस ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5जी स्मार्ट फोन आणण्याचा विचार आहे. त्यानंतर मागणी वाढल्यास त्याची किंमत आणखी कमी करून २ हजार ५०० ते ३००० रुपये केली जाऊ शकते. मात्र, यासंबंधी अद्याप जिओकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सद्यस्थितीस भारतात 5जी स्मार्टफोनची किंमत २७ हजार रुपयांपासून पुढे आहे.

देशात पहिल्यांदा 4जी मोबाइल जिओने लॉन्च केला होता. १५०० रुपये रिफंडेबल डिपॉझिट केल्यानंतर जिओकडून ग्राहकांना हा फोन मोफत देण्यात आला होता. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारताल 2जी मुक्त करण्याचे आवाहन केले होते.

मुकेश अंबानी यांनी त्यावेळी 2जी फीचर असलेला फोन वापरणाऱ्या ३५ कोटी युजर्सना रास्त दरातील स्मार्टफोनमध्ये बदलण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला होता. मुकेश अंबानी यांनी हे विधान तेव्हा केले होते जेव्हा भारत 5जी युगात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे.