जिओ मोबाइल, सीम कार्ड नंतर आता येते आहे जिओ गिगा फायबर! जिओ गिगा फायबरच्या नोंदणीला सुरूवात होत असून ज्या शहरातून सर्वाधिक नोंदण्या येतील त्या शहराला पहिले गिगा फायबर कनेक्शन मिळेल अशीही माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीचे हे पहिले गिगा फायबर असणार आहे. गिगा फायबरमुळे ग्राहकांना आयपीटीव्ही, ब्रॉडबँड, लँडलाइन, व्हर्चुअल रिअॅलिटी गेम यांसारख्या सुविधा मिळू शकणार आहेत. गिगा फायबरची चाचणी गेले अनेक महिने सुरू होती. देशातल्या ११०० शहरांपर्यंत जिओ फायबरचे जाळे पसरवण्याचा जिओचा मानस आहे. जिओ फायबरद्वारे अनेक कार्यालये, ऑफिस आणि घरातल्या युजर्सना फायबर कनेक्शन मिळेल.

कशी करता येणार नोंदणी?
जिओ फायबरची नोंदणी jio.com वर करता येईल, यासाठी कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. नोंदणी करताना ग्राहकाला आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि इमेल याची माहिती द्यावी लागणार आहे.

जिओ गिगा फायबरची किंमत इतर फायबर्सच्या तुलनेत अर्ध्या किंमतीत मिळेल. या फायबरचा सगळ्यात कमी किंमतीचा प्लॅन ५०० रुपयांचा असेल अशीही माहिती समोर येते आहे. तसेच सुरूवातीला ग्राहकांना जिओ गिगा फायबरसाठी ४ हजार ५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिटही भरावे लागणार आहे. सुरूवातीचे नव्वद दिवस १०० एमबीपीएस स्पीडसोबत १०० जीबी डेटाही मिळणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.