काही दिवसांपूर्वीच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्रायने) एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे प्रीमियम प्लॅन ब्लॉक केले. रिलायन्स जिओने केलेल्या तक्रारीनंतर ट्रायने हे पाउल उचलल्याचं आता समोर आलं आहे. ट्रायने भारती एअरटेलचा प्लॅटिनम प्लॅन आणि व्होडाफोन-आयडियाचा RedX प्लॅन ब्लॉक केला आहे. या प्लॅन्समुळे जे प्रीमियम ग्राहक नाहीयेत त्यांच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो, असं ट्रायने म्हटले आहे.

रिलायन्स जिओने 8 जुलै रोजी एक पत्र ट्रायचे चेअरमन आरएस शर्मा यांना पाठवून व्होडाफोन आणि आयडियाच्या प्लॅन्सबाबत तक्रार केली होती. व्होडाफोन-आयडियाचा RedX आणि एअरटेलचा प्लॅटिनम प्लॅन तपासावेत आणि ट्रायच्या सध्याच्या रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये ते प्लॅन बसतात का किंवा यामुळे ग्राहकांना नुकसान होतं हे बघावं, अशा आशयाचं पत्र जिओने पाठवलं होतं. दोन्ही कंपन्या RedX आणि प्लॅटिनम प्लॅनमध्ये फक्त खोटे दावे करत आहेत. या प्लॅन्सद्वारे दोन्ही कंपन्या केवळ मार्केटिंग करत आहेत. अशाप्रकारच्या ऑफर देणारा कोणताही प्लॅन मार्केटमध्ये येत असेल तर तो ट्रायच्या नियमांतर्गत आहे का अशी विचारणा पत्राद्वारे जिओकडून करण्यात आली होती.

यानंतर दोन्ही प्लॅन तपासून 11 जुलै रोजी ट्रायने, या प्लॅन्समुळे जे प्रीमियम ग्राहक नाहीयेत त्यांच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो, असं  म्हणत व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल दोघांनाही प्रीमियम प्लॅन ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता. ब्लॉक केलेल्या प्लॅन्सअंतर्गत काही सिलेक्टेड युजर्सना हायस्पीड इंटरनेट वापरता येत होतं, पण यामुळे अन्य ग्राहकांच्या (प्रीमियम नसलेल्या) स्पीडवर परिणाम होतो असं सांगण्यात आलं आहे. त्यावर, उत्तर देण्याची संधीही दिली नाही असं म्हणत ट्रायच्या निर्णयावर व्होडाफोनकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.