अत्याधुनिक फीचर्स असलेली Renault ची नवी Duster लाँच झाली आहे. नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये ही फेसलिफ्ट डस्टर एसयूव्ही भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून यातील 3 पेट्रोल आणि 6 डिझेल इंजिन व्हेरिअंट आहे. या एसयूव्हीला फ्रेश लूक देण्यासाठी यामध्ये अनेक कॉस्मेटिक अपडेट देण्यात आलेत. याशिवाय इंटेरियरमध्येही अनेक बदल करण्यात आलेत. नव्या गाडीत एकूण 25 नवे फीचर्स देण्यात आलेत, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

लूक
फेसलिफ्ट डस्टरला फ्रेश लूक देण्यासाठी यामध्ये क्रोम फिनिशसह नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन फ्रंट बंपर, फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, रूफ रेल्स, 16-इंच एव्हरेस्ट डायमंड कट अॅलॉय व्हिल्स आणि मागे प्लास्टिक क्लॅडिंग आहे. बोनटमध्येही बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या मॉडलपेक्षा यातील बोनट अधिक उंच असून कॅस्पियन ब्ल्यू आणि महोगॅनी ब्राउन अशा दोन रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल.

इंटेरियर –
नव्या डस्टरच्या कॅबिनमध्येही बदल करण्यात आलेत. यात अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह अपग्रेडेड टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम आणि सेंटर कंसोलवर एसी व्हेंट्स आहेत. डॅशबोर्डलाही नवं डिझाइन देण्यात आलं असून सेंटर कंसोल आणि इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही थोडाफार बदल झाला आहे.

सुरक्षा – 
सुरक्षिततेसाठी यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग सेंसर्स आणि स्पीड अलर्ट सिस्टिम यांसारखे फीचर्स सर्व व्हेरिअंटमध्ये देण्यात आलेत. तर टॉप व्हेरिअंटमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि हिल-स्टार्ट असिस्टंट यांसारखे फीचर्स आहेत.

इंजिन –
फेसलिफ्ट डस्टरमध्ये वापरण्यात आलेले दोन्ही इंजिन आधीपासून उपलब्ध असलेल्या मॉडलमधूनच घेण्यात आलेत. यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 106hp ची ऊर्जा आणि 142Nm टॉर्क निर्माण करतं. या इंजिनासह 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्टेप CVT ऑटोमैटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. डस्टरचं डिझेल इंजिन 1.5-लिटरचं असून याला दो वेगवेगळे पावर आउटपुट आहेत. यातील कमी पावर असलेलं व्हर्जन 85hp ची ऊर्जा आणि 200Nm टॉर्क निर्माण करतं. या व्हर्जनसह केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. तर अधिक पावर असलेलं व्हर्जन 110hp ची ऊर्जा आणि 245Nm टॉर्क निर्माण करतं. या व्हर्जनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.

किंमत – या नव्या फेसलिफ्ट डस्टरची किंमत 7.99 लाख ते 12.50 लाख (एक्स शोरुम) रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे.