उन्हाळ्यामध्ये सुर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होताना अनेकदा काय करावे हे सुचत नाही. अशावेळी एखादा छोटा खिशात राहणारा एसी असता तर बरं झालं असत असं वाटून जातं. शाहरुख खानने केलेल्या एका पावडरच्या जाहिरातीमध्येही तो ही पावडर जगातील सर्वात छोटा एसी आहे असं म्हणतो. मात्र आता खरोखरच अशा छोटा एसी लवकरच बाजारात येणार आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार जगप्रसिद्ध सोनी कंपनीने अंगावर घातला येणारा म्हणजेच वेअरेबल एसी तयार केला आहे. अशाच प्रकारची आणखीन यंत्रे बनवण्यासाठी सोनीने लोकांच्या माध्यमातून पैसा उभा करण्यास सुरुवात केली आहे.

रेकॉन पॉकेट असं या एसीचं नाव असणार आहे. मोबाइलहून लहान आकाराच्या या एसीमधील मागील भागातून थंड हवा कपड्यांमध्ये सोडली जाईल. मात्र हा एसी कोणत्याही कपड्यांबरोबर वापरता येणार नसून एसी फिट होणारा टी-शर्ट यासाठी घालणे बंधनकारक असणार आहे. एसीबरोबरच हे शर्ट विकत घेता येणार आहे. टी-शर्टच्या मागच्या भागावर मानेखाली या वेअरेबल एसीचा स्लॉट ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनच्या सहाय्याने या एसीचे तापमान नियंत्रण करता येणार आहे. त्यामुळे सतत या एसीला हात लावण्याची आणि तो स्लॉट हलण्याची काळजी राहणार नाही. याहून भन्नाट म्हणजे सतत तापमान कमी जास्त करण्याचा त्रास नको असेल तर शरिराच्या तापमानानुसार एसीचे तापमान अपोआप नियंत्रित होण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

गाड्यांमधील एसी आणि वाईन कूलरमध्ये वापरण्यात येणाऱ्या पेल्टियर तंत्रज्ञानाच्या मदतीने हा एसी तयार करण्यात आला आहे. बॅटरीवर चालणारा हा एसी दोन तास चार्ज केल्यानंतर 90 मिनिटांपर्यंत काम करेल. मागील दोन दिवसांमध्ये लोकांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी दोन लाख डॉलर इतकी रक्कम गोळा झाली आहे. हा एसी अवघ्या 130 डॉलरला म्हणजे केवळ 9 हजार 200 रुपयांना उपलब्ध असणार आहे. पण यासंदर्भातील एक वाईट गोष्ट म्हणजे हा एसी केवळ जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र चीनमध्ये या एसीची जोरदार चर्चा सुरु आहे.